कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला आले मंत्री भरत शेठ गोगावले
कोल्हापूर
नवीन वर्षाची सुरुवात श्री अंबाबाईच्या दर्शनाने करण्यासाठी मंत्री भरत गोगावले, हे कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला.
यावेळी गोगावले म्हणाले, दरवर्षी इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात श्री करवीर निवासिनी अंबाबाई च्या दर्शनाने करत असतो, यंदा मंत्रिपद मिळाल्यामुळे जास्त आनंद आहे. माझी गेल्या पंधरा वर्षाची तपश्चर्या फळाला आली. महाराष्ट्राच्या जनतेला सुख समाधान आणि आयुष्यमान लाभो ही प्रार्थना असेल. एकनाथ शिंदे साहेबांनी मला दिलेल्या खात्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. मला गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचता येईल, असं खातं माझ्याकडे देण्यात आले आहे.
पुढे बोलताना गोगावले म्हणाले, नाराजी कोणाच्यातही नाही. एक-दोन दिवसात सर्वजण पदभार स्वीकारतील. आम्ही देखील अद्याप पदभार स्वीकारलेला नाही. उद्या जाऊन स्वीकारू. सगळ्यांनी एक दोन खात्यावरच दावा केला तर तसं होऊ शकणार नाही. जे खात मिळालेल आहे, त्याला न्याय देण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा. या आठवड्याभरात पालकमंत्रीपद मिळेल. रायगड पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे असं वाटत नाही. मी सीनियरमोस्ट आमदार आहे. गेल्यावेळी तो जिल्हा आमच्याकडे होता त्यावेळी मी मंत्री नव्हतो. आता मी स्वतः मंत्री आहे पालकमंत्री पद मला मिळेल अशी अपेक्षा आहे
बीड घटनेबद्दल बोलताना ते म्हणाले, बऱ्याच लोकांची बीडचा पालकमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारावे, अशी मागणी आहे. मात्र काय करायचं ते स्वतः मुख्यमंत्री असल्याने ते ठरवतील. अपयश असं म्हणता येणार नाही पोलीसचे प्रयत्न सुरू होते. त्याला घाबरून त्यांनी शरणागती पतकरली. पोलीस त्यांचं काम चोखपणे करत होते. वाल्मीक कराडला माहीत होतं आज ना उद्या तो सापडणार आहे, त्यामुळे त्यांनी स्वतः सरेंडर केलं. धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची विरोधकांनी मागणी केली आहे. मात्र संपूर्ण तपासणी झाल्यानंतरच मुख्यमंत्री ठरवतील.
बरेचसे ठाकरे गटाचे कार्यकर्ते शिंदे गटात येण्यासाठी उत्सुक आहेत आणि आमची सुरुवात देखील झालेली आहे. जे येतील त्यांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न असेल. परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांनी नुकताच पदभार घेतलेला आहे. निवडणुकीच्या आधी पंधरा दिवस मला महामंडळाचा चार्ज मिळाला होता. मात्र आता ते संपूर्ण मंत्री आहेत असं काही घडलं असेल तर त्याची चौकशी करून त्याला शासन होईल, असेही मंत्री गोगावले म्हणाले.
Previous Articleजिल्ह्यात 788 पोलिसांनी रस्त्यावरच केले नववर्षाचे स्वागत
Next Article नवीन वर्षातील संकल्प : से नो टू एपीके फाइल








