उद्योगपती गौतम अदानी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे सिल्वर ओक बंगल्यावर ‘राष्ट्रवादीच्या वेळेनुसार’ बरोब्बर दहा वाजून दहा मिनिटांनी पोहोचत आणि तब्बल दोन तास थांबून केवळ आभार मानले असे म्हणता येणार नाही. त्यांनी चर्चा केलीच असेल. त्यांच्याकडे केंद्रासाठीचा संदेश पवारांनी सोपवला असण्याचीच शक्यता अधिक आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसवर संकट घोंगावत असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांच्या रूपाने राष्ट्रवादीत बंड होईल आणि त्यांच्यासोबत चाळीस आमदार बाहेर पडतील असे वातावरण गेले काही दिवस होते. उद्धव ठाकरे यांच्या सिल्वर ओक बंगल्यावरील भेटीनंतर या वातावरणाला टाचणी लागली. संजय राऊत यांनी राष्ट्रवादीत नेमके काय सुरू आहे याची अधिकृतरित्या महाविकास आघाडी म्हणून आपल्या लेखातून चिंता व्यक्त केली. त्यापूर्वी अंजली दमानिया यांनी एक गौप्यस्फोट केला होता.
प्रकाश आंबेडकर यांनी त्यात सस्पेन्स वाढवला आणि उरलेली जबाबदारी खुद्द अजितदादा पवार यांनी पार पाडली होती. मात्र या सगळ्यात आपल्या पक्षाची शिवसेनेप्रमाणे दुरावस्था होऊ देण्यास शरद पवार कोणत्याही किमतीवर तयार नाहीत. ते याबाबतची प्रत्येक लढाई आपल्या राजकारण कौशल्याच्या जोरावर लढत राहणार, हा संदेश त्यांनी वेगवेगळ्या कृतीतून दिला होता. परिणामी अजितदादांना आपण कोठेही जाणार नाही आणि शेवटचा श्वास असेपर्यंत राष्ट्रवादीचाच राहू अशी घोषणा करावी लागली होती.
या सगळ्या चर्चा उठल्या आहेत त्या विनोद तावडे समितीच्या अहवालानंतर. या अहवालात राज्यात पक्षाची प्रतिमा वाईट बनत चाललीय असा आणि त्याचा फटका लोकसभा निवडणुकीत बसण्याचा उल्लेख असल्याचे सांगितले जाते. राज्यातून निवडून येणाऱ्या भाजपच्या खासदारांची संख्या खूप मोठ्या प्रमाणावर घटेल असे स्पष्ट मत तावडे यांनी आणि त्यांच्यासह अभ्यास करणाऱ्या समितीने नोंदवल्याने भारतीय जनता पक्षामध्ये चलबिचल आहे.
गुजरात निवडणुकीसह राष्ट्रीय राजकारणात संघटनेची जबाबदारी पार पाडून विनोद तावडे यांनी गेल्या साडेतीन वर्षात आपल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासह श्रेष्ठींच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण केले आहे. त्यांना वारंवार पत्रकार राज्याच्या राजकारणात कधी येणार? असे छेडत असतात आणि मी दिल्या घरी सुखी आहे, असे ते सावधपणे बोलत राहतात. मात्र त्यांच्या अहवालाने राज्याच्या सध्याच्या राजकारणावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या भाष्य झाले आहे.
या अहवालाचा गवगवा झाल्याने त्या वातावरणातच अजितदादा पवार यांच्याबाबतची चर्चा जोराने सुरू झाली. या चर्चेला संजय राऊत यांनी हवा दिली असा दादांनी समज करून घेतला आहे, असे दिसते. त्यामुळे त्यांनी आधी इतर पक्षाच्या प्रवक्त्यांनी आमच्या पक्षाची वकिली करू नये असे सांगितले होते.
आता त्यांनीच कोण संजय राऊत? असे उद्गार काढले आहेत. इतरांनी केलेल्या गौप्यस्फोटापेक्षा राऊत यांनी केलेला स्फोट दादांना अधिक मनावर घ्यावा लागला हे विशेष आहे. एका अर्थाने शरद पवार यांनी पक्षातून बाहेर जाऊ इच्छिणाऱ्यांना एक प्रकारे मोकळीक देण्याचा प्रयत्न केला असून कोणावरही कारवाईचा उल्लेख न करता एक प्रकारचा राजकीय दबाव निर्माण केला आहे. पवारांना डावलून उंबरठा ओलांडावा तर भविष्य अनिश्चित आणि आहे तिथेच थांबावे तर उद्याची चिंता सतावते अशी स्थिती झाली आहे. अजितदादांसोबत अनेक नेते बाहेर पडतील अशीही चर्चा उठली होती. मात्र, पवारांनी असे कोणीही बाहेर पडणार नाहीत असे वक्तव्य केल्याने पक्षातून बाहेर जाऊ इच्छिणाऱ्यांना कोड्यात टाकले आहे.
या परिस्थितीत राष्ट्रवादीतील वादळ तूर्तास शमले असे म्हणावे तर सर्वोच्च न्यायालयात निकाल लागल्यानंतर तो निकाल मुख्यमंत्री शिंदे आणि सोळा आमदारांच्या विरोधात गेला तर राष्ट्रवादीचे दहा-पंधरा आमदार राजीनामा देऊन भाजपची सत्ता अबाधित राखतील आणि लोकसभा निवडणुकीपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून राज्याची धुरा वाहून राज्य आणि केंद्राची निवडणूक एकाचवेळी जाहीर केली जाईल अशी चर्चा उठली आहे. याच पार्श्वभूमीवर अचानक गौतम अदानी यांनी सिल्वर ओकचा दौरा काढणे आश्चर्य वाटण्यासारखे नाही. शिवाय या दौऱ्यातून पवारांच्यावर दबाव आणला जाईल अशी परिस्थिती आता उरलेली नाही.
उलट गौतम अदानी यांची बाजू मोदी शहांसह केंद्र सरकारमधील कोणीही घेऊ शकले नाही. ते धाडस पवारांनी दाखवले असल्याने त्या सर्वांवरच पवारांच्या दबावाचे वजन अधिक वाढले आहे. त्यामुळे या भेटीत अघळपघळ चर्चा आणि चाय बिस्कुट संपवणे हा उद्देश नव्हता हे तर स्पष्ट आहे. दोन तास दहा मिनिटे इतका वेळ गौतम अदानी यांच्यासारख्या उद्योगपतीने पवारांसारख्या व्यस्त राजकारण्यासोबत घालवला असेल तर तो पवारांच्या मर्जीने खर्च झालेला वेळ आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. पवार काय म्हणतात हेच पोहोचवणे किंवा त्यांचे मत समजून घेणे हा या भेटीमागील उद्देश असू शकतो. त्यामुळे पवार स्वत:चे आणि स्वत:च्या पक्षाचे नुकसान होईल अशा कोणत्याही विषयावर 130 मिनिटे वाया घालवणार नाहीत.
या प्रत्येक मिनिटातील प्रत्येक शब्द हा महत्त्वाचाच असणार. ज्यामुळे अजून तरी कोणत्याही प्रसार माध्यमावर पवारांच्या विरोधात एकही पुडी सुटलेली नाही! आज सर्व सत्ता एकाच पक्षाकडे एकवटलेली असताना आणि इतर कोणत्याही पक्षाला स्वत:चा आवाज उंचावण्यास वाव नसताना पवारांकडे अदानी येतात हीच गोष्ट मोठी आहे. अदानी यांच्याकडे कोणीही जाईल हो..!!
शिवराज काटकर








