हिंडलगा परिसरातील जनतेचा सवाल : बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाचे सोयीस्कर दुर्लक्ष?
बेळगाव : आंबेवाडी क्रॉसवरील मटका अड्ड्यावर झालेल्या कारवाईने एकच खळबळ माजली आहे. याच परिसरात आणखी अनेक अड्डे उघडपणे सुरू आहेत. या अड्ड्यांवर कारवाई कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गुरुवारी रात्री अटक करण्यात आलेल्या दहा जणांविरुद्ध बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीबी व सीईएनच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे आंबेवाडी क्रॉसजवळील बॉक्साईट रोडला लागूनच असलेल्या एका शेडवर छापा टाकून दहा जणांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून 1 लाख 74 हजार रुपये रोकड व मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या आहेत. या शेडवजा घरात पाच टेबल घालून मटका घेण्यात येत होता.
सीसीबीचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्नाटक पोलीस कायदा कलम 78(1)(ए), 79, 80 अन्वये दहा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. अशोक निंगाप्पा कांबळे, मनोज कांबळे, रोहित संजय काकतकर, अब्दुलसलाम अब्दुलहमीद शेख, शाम भगवानदास गुलबानी, संभाजी बाबू मगदूम, सुनील कैलास राणे, विशाल शामराव खटावकर, कृष्णा दादू लमाणी, लक्ष्मण शंकर लमाणी अशी त्यांची नावे आहेत. ते सर्वजण हिंडलगा, जयनगर, विजयनगर परिसरातील राहणारे आहेत. उपलब्ध माहितीनुसार हिंडलगा परिसरात आणखी अनेक अड्डे उघडपणे सुरू आहेत. फॉरेस्ट नाक्याजवळ, स्मशानाजवळ, बाची येथील शेतवडीत, ज्योतीनगर, वैभवनगर, यमनापूर, अन्नपूर्णावाडी येथील क्वॉरी परिसर, अनगोळ, खासबाग अशा अनेक ठिकाणी मटका व जुगारी अड्डे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. या अड्ड्यांवरही कारवाई होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, मार्केट व एपीएमसी पोलिसांनीही मटका अड्ड्यांवर कारवाई केली आहे. मार्केट पोलिसांनी पंकज मोहन जाधव, किशोर गजानन सावंत, गजानन शशिकांत गर्डे या तिघा जणांवर एफआयआर दाखल केला आहे. त्यांच्याजवळून 3 हजार 700 रुपये रोख रक्कम व मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिसांनी कामत गल्ली येथील पंकज व शिवाजीनगर येथील गजानन या दोघा जणांना अटक केली असून आपण गजानन गर्डे याला चिठ्ठ्या पोहोचवत असल्याची कबुली त्यांनी दिली आहे. एपीएमसी पोलिसांनी कुमारस्वामी लेआऊटजवळ किरण सुरेश बजंत्री, रा. ज्योतीनगर, कंग्राळी खुर्द याला अटक करून त्याच्याजवळून 300 रुपये रोकड जप्त केली आहे.
ग्रामीण पोलीस स्थानकाची चौकशी होणार
बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील आंबेवाडी क्रॉसजवळ मटका अड्ड्यावर सीसीबी व सीईएनच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली आहे. ही कारवाई ग्रामीण पोलिसांनी का केली नाही? याची चौकशी करून त्यांच्यावर अहवाल पाठविण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी दिली.









