आरबीआय नूतन गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचे प्रतिपादन : 26 वे गव्हर्नर म्हणून रुजू
वृत्तसंस्था/ मुंबई
संजय मल्होत्रा यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) 26 वे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला. त्यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा राहणार आहे. आरबीआय गव्हर्नर या नात्याने पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, त्यांच्या सर्वोच्च प्राधान्यांमध्ये आर्थिक विकासाला गती देणे, धोरणनिर्मितीमध्ये स्थिरता सुनिश्चित करणे आणि आर्थिक समावेशन विस्तारणे यांचा समावेश राहणार असल्याचे गव्हर्नर मल्होत्रा यांनी स्पष्ट केले आहे.
आर्थिक समावेशात बरीच प्रगती झाली आहे पण अजून बरेच काही साध्य करायचे आहे. या प्रयत्नांना पुढे नेण्यासाठी त्यांनी आर्थिक व्यवस्थेतील सर्व सहकाऱ्यांचे सहकार्य महत्त्वाचे असणार आहे.
विकास दरातील मंदीमुळे फेब्रुवारीच्या पतधोरण आढावा बैठकीत दर कपातीची मागणी करण्यात आली आहे. आरबीआय गव्हर्नर म्हणून मल्होत्रा यांनी पहिल्यांदाच या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. दरम्यान मल्होत्रा म्हणाले, ‘माझ्या पूर्वीच्या भूमिकेतही मी नैतिक स्थिरतेसाठी प्रयत्न करत होतो. करप्रणाली धोरण असो किंवा वित्तीय किंवा आर्थिक धोरण असो, सर्व व्यवसाय आणि लोकांना धोरणात्मक सातत्य आवश्यक असल्याचेही स्पष्ट केले.
गव्हर्नर मल्होत्रा राजस्थान केडरचे आयएएस अधिकारी
शक्तिकांत दास यांची जागा घेणारे मल्होत्रा हे राजस्थान केडरचे 1990 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. आरबीआय गव्हर्नर म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी मल्होत्रा हे वित्त मंत्रालयात महसूल विभाग आणि वित्तीय सेवा विभागाचे सचिव म्हणून कार्यरत होते.









