महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंचे नाव घेताच मराठी अस्मितेची आठवण होते. बाळासाहेबांच्या वारशाने उभे राहिलेले दोन चुलत भाऊ, मतभेदांनी विभागले गेले होते. दोघांनी मराठी हक्कांसाठी लढा दिला, पण त्यातून कट्टर प्रादेशिक हीत साधलेले नाही. त्याची महाराष्ट्राला गरज आहे. ही कट्टरता भिनण्यासाठी दोन्ही ठाकरेंनी लेचीपिची भूमिका सोडून ठाम बोलले, वागले पाहिजे. तरच इतर पक्षांना ती भाषा बोलायची वेळ येईल. मराठा मुंबईत येऊन उपाशी राहिला, गणपतीची दारे त्याला बंद केली गेली, कोळ्यांचा तराफा बाजुला सारला तेव्हा दोन्ही ठाकरेंची कृती उसळून उठणारी आणि पर्यायी राजकारणाची हवी होती. मराठी माणूस तुमच्यासाठी हळवा होतो तर त्याच्यासाठी तुम्ही कट्टरच असले पाहिजे. मैदानात आहात तर त्या मैदानाची आब राखण्याची जबाबदारी तुमचीच आहे त्यातून पळ काढू नका. शमीच्या झाडाला टांगलेल्या कोदंडाचा टणत्कार करा ही अपेक्षा आहे.
2024 च्या अखेरीपासून, त्यांची जवळीक वाढताना दिसत आहे. आणि ही जवळीक केवळ राजकीय नाही, तर सण-उत्सवांच्या माध्यमातून मराठी माणसाच्या हळव्या भावनांना जोडणारी नक्कीच आहे. हा घटनाक्रम महाराष्ट्राच्या राजकीय पटावर एक नवा अध्याय जोडत आहे. पण, ही मराठी हिताची कट्टर चळवळ करणे त्यांच्याकडून अपेक्षित आहे. या अस्थिर काळातच ती चळवळ स्थिर होऊ शकते. इतर पक्षांनाही मराठी हिताच्या मागे फरफटत किंवा सरपटत आणले जाऊ शकते. पण दोन्ही भाऊ आधी त्यासाठी कट्टर झाले पाहिजेत. तर खालचे सैन्यही गल्लीबोळातली बेईमान तडजोड करणार नाहीत.
2024 च्या डिसेंबर महिन्यात दादर येथील एका कौटुंबिक लग्न सोहळ्यात राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. हा ठाकरे कुटुंबातील बंधूभावाच्या पुनरागमनाचा प्रारंभ होता. संजय राऊत यांनी तेव्हा म्हटले, ‘उद्धव आणि राज हे भाऊ आहेत, त्यांचा निर्णय महाराष्ट्र स्वीकारेल.’ मराठी संस्कृतीत लग्न हा केवळ विवाह नाही, तर कुटुंब एकत्र येण्याचा, भावना जोडण्याचा उत्सव आहे. या भेटीने ठाकरे बंधूंच्या जवळीकतेची सुरुवात झाली आणि मराठी मनात आशेचा किरण उजळला. 2025 च्या सुरुवातीला, विशेषत: जुलै महिन्यात, हिंदी सक्तीच्या मुद्यावरून मराठी अस्मितेचा प्रश्न उपस्थित झाला. महाराष्ट्र सरकारच्या हिंदीला प्राधान्य देणाऱ्या धोरणाविरोधात लोक उभे राहू लागल्यानंतर मराठी भाषा आणि संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी राज आणि उद्धव यांनी एकत्रित येण्यास सुरुवात केली. हा दिलासा इतका मोठा ठरला की सरकार गडबडले. दोन्ही ठाकरेंनी ‘मराठी विजय रॅली’ आयोजित केली. मुंबईच्या वरळी डोम येथे झालेल्या या मेळाव्यात 20 वर्षांनंतर दोघे एकाच मंचावर आले. उद्धव ठाकरे यांनी भाषणात म्हटले, ‘आम्ही दोघेही अनुभवले आहे की कसे आमचा वापर करून फेकून देतात. आज आम्ही एक आहोत.’ राज ठाकरे यांनी सुरुवात ‘सन्माननीय उद्धव ठाकरे आणि तमाम मराठी बांधवांनो’ अशी करून मराठी एकतेचे आवाहन केले. हा मेळावा विजयाचा उत्सव होता, ज्यात मराठी भाषेच्या विजयाची घोषणा करण्यात आली. पण यापुढे कट्टर मराठी राजकारणाचा कार्यक्रम दोन्ही भावांनी हाती घेणे अपेक्षित होते. मराठी माणूस सण-उत्सवातून एकत्र येतो, आणि हा मेळावा त्याच भावनेचा भाग होता. त्या भावनेला दसरा मेळाव्यात तरी दोन्ही भाऊ हात घालतील आणि शमीच्या झाडाला टांगलेल्या कोदंडाचा टणत्कार करतील अशी अपेक्षा आहे.
गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव आहे, जो बाळासाहेब ठाकरे यांनीही मराठी विचार बळकटीसाठी वापरला. 2025 च्या ऑगस्ट महिन्यात, गणेश चतुर्थीच्या निमित्ताने उद्धव ठाकरे तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे यांच्या शिवतीर्थवर गेले. राज यांच्या आमंत्रणावर ते सहकुटुंब बाप्पाच्या दर्शनासाठी आले. ही भेट गेल्या दोन महिन्यांत तिसरी होती. जुलैतील रॅलीनंतरची ही भेट युतीची नांदी वाटते. गणेशोत्सवात मराठी माणूस घराघरातून बाहेर पडतो, सार्वजनिक मंडळांमध्ये एकत्र येतो. ठाकरे बंधूंची ही भेट उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मराठी हळवेपणाला स्पर्श करते. मराठी मन हळवे असते, ते कुटुंब, परंपरा आणि भावनांना महत्त्व देते. सण-उत्सव हे केवळ धार्मिक नाहीत, तर सामाजिक एकतेचे साधन आहेत. राज आणि उद्धव यांची जवळीक या उत्सवांतून वाढत आहे, ज्यामुळे मराठी माणसाच्या हृदयात भावनिक सुखाची लहर उसळते. पण आता ती केवळ भावनिक ठेवून नव्हे तर कट्टर राजकीय हिताची बनवण्याची गरज आहे. तसे वातावरणही आहे. ठाकरे बंधूंचा त्यासाठी स्पष्ट पुढाकार हवा आहे.
मराठी माणसाचे हळवेपण हे त्याच्या संस्कृतीत रुजलेले आहे. तो राजकारणापेक्षा भावनांना प्राधान्य देतो आणि कोणाच्याही बोलण्याला फसतो. मराठी माणसाचे हे लेचेपेचे पण, त्यांच्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक अस्मितेच्या गल्लतीतून झाला आहे. प्रादेशिक हीत हेच राष्ट्रीय हीत अशा भावनेत मराठी विचारांना कट्टर वळण द्यायची हीच योग्य वेळ आहे. ठाकरेंना ते करावे लागेल अन्यथा इथल्या मराठी लोकसंख्येची मुंबईतील किंमत शून्य होईल. मिलिंद देवरा सारख्यांच्या नाकात मराठी विरोधी जो वास बसला आहे त्यातून त्यांनी पुन्हा दुस्वास दाखवून दिला. त्यांच्या तीर्थरुपांना आणि त्या वृत्तीला बाळासाहेबांनी व्यंगचित्रातच नव्हे प्रत्यक्षात पंक्चर केले होते. त्याची पुनरावृत्ती या बंधूंनी केली पाहिजे. त्यासाठी ज्या त्या वेळी उत्तर आले पाहिजे. गप्प राहणे योग्य नाही. जुलैतील रॅलीत उद्धव यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना म्हटले, ‘आपला मालक आल्यावर जय गुजरात म्हणणारा माणूस मराठीचा पाईक कसा?’ हे मराठी अस्मितेचे रक्षणाचे उदाहरण आहे. राज ठाकरे यांनीही मराठीसाठी लढा देणे गुंडागर्दी ठरते का, असा सवाल उपस्थित केला. ही एकता मराठी माणसाच्या हळव्या भावनांना जोडते. पण, त्या कार्यक्रमाने पुढे सातत्य राखले नाही. देवेंद्र फडणवीस यांनी या रॅलीला ‘रुदाली’ म्हटले. कारण, बोलून गेलेल्या ठाकरेंचे अनुयायी काही कृती करणार नाहीत याचा त्यांना मोठा विश्वास आहे. ठाकरे आणि त्यांच्या अनुयायांना असे गृहीत धरले जाते ही स्थिती त्यांना कट्टरपणे बदलावी लागणार आहे. तर मराठी माणूसही कट्टर होईल. गणेशोत्सवासारख्या उत्सवात ठाकरे बंधू एकत्र येतात, तेव्हा ते केवळ राजकीय नाही, तर सांस्कृतिक एकतेचे प्रतीक ठरते.
अशा काळी दोन्ही बंधूंची वाटचाल आता राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आहे. 20 वर्षांच्या मतभेदानंतर ही जवळीक महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (युबीटी) यांच्यातील युतीची शक्यता वाढवते. तज्ञांच्या मते, ही एकता मराठी मतदारांना एकत्र आणेल आणि भाजप-शिंदे गटाला धक्का देईल. संजय राऊत यांसारखे नेते याला कौटुंबिक एकतेचे प्रतीक म्हणतात. पण ही वाटचाल केवळ राजकारणापुरती मर्यादित नाही, सण-उत्सवांतून मराठी हळवेपणाला बळकटी येते. तिथे विचारांची बळकटी आणि कट्टरता वाढवण्याची ठाकरेंची जबाबदारी आहे. ते ती पार पाडणार आहेत का? ते दसऱ्याला सांगितले पाहिजे. अशा प्रकारे, सण-उत्सव आणि ठाकरे बंधूंची वाढती जवळीक ही मराठी माणसाच्या हळवेपणाची झालर आहे. ही वाटचाल महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण देईल आणि मराठी मनाला अभिमानाची भावना देईल. पण केवळ भावनेच्या नव्हे मराठी मतलबाचे राजकारण सुरू झाले पाहिजे आणि ती भाषा भाजप आणि काँग्रेस दोघांना बोलायला शिकवली पाहिजे. ही शहरी आणि ग्रामीण महाराष्ट्रात समान होरपळणाऱ्या हळव्या मराठी माणसांची डोळस अपेक्षा आहे.
शिवराज काटकर








