नाशिकच्या वृद्धाला अटक, महाराष्ट्रात शिकार; कर्नाटकात विक्री

बेळगाव : नाशिक जिल्ह्यातील एका वृद्धाला अटक करून त्याच्याजवळून मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचे अवयव, कातडी, नखे, शिंगे जप्त करण्यात आली आहेत. विजापूर जिल्ह्यातील बागलूर, ता. सिंदगी बसथांब्याजवळ मंगळवारी ही कारवाई करण्यात आली आहे. या अवयवांचा वापर वास्तू व करणीसाठी केला जात होता. काळवीटाची शिंगे, कवटी, कातडी जप्त करण्यात आली आहे. सीआयडी विभागाचे अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक के. व्ही. शरतचंद्र व हुबळी येथील पोलीस उपअधीक्षक मुत्तण्णा सरवगोळ आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सीआयडी वनविभागाच्या बेळगाव येथील पोलीस उपनिरीक्षक रोहिणी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. पवन जाफर भोसले (वय 60) रा. अस्वलदरा, जि. नाशिक असे अटक करण्यात आलेल्या वृद्धाचे नाव आहे. नाशिकसह महाराष्ट्रातील विविध जंगलातून वन्यप्राण्यांची शिकार करून त्यांचे अवयव कर्नाटकात आणून विक्री केले जात होते. विक्रीसाठी पवन सिंदगी तालुक्यातील बागलूर येथे आला होता. त्यावेळी ही कारवाई करण्यात आली आहे. य् ाा वृद्धाच्या ताब्यातून 807 घोरपडींचे लिंग, 116 समुद्री माशांचे खवले, दोन रानमांजरांचे पंजे, त्याची नखे, तीन अस्वलांची नखे, 28 जलचर पक्ष्यांचे पाय, दोन घोरपडींचे पाय, 73 घुबडांचे पंख, अस्वलाचे 4 दात, 32 मुंगुसांचे पंजे, 7 मुंगुसांचे जबडे, मुंगुसाच्या चमड्याचे गोळे, रानडुकराचे 26 दात, अनोळखी प्राण्यांची तीन नखे, 4 काळवीटांची शिंगे, दोन काळवीटांची शिंगासह कवटी, सात काळवीटांची कातडी जप्त करण्यात आली आहे. य् ाा कारवाईनंतर पोलीस उपनिरीक्षक रोहिणी पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी नाशिकच्या वृद्धावर कलम 9, 39, 40, 44, 48(ए), 49 (बी), 50, 51, सहकलम 55, वन्यजीवी संरक्षण कायदा 1972, शेड्युल 1 आणि 2 अन्वये एफआयआर दाखल केला असून त्या वृद्धाला मंगळवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. सीआयडी विभागाचे अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक के. व्ही. शरतचंद्र यांनी बेळगाव येथील पथकाचे कौतुक केले आहे. जप्त केलेले वन्यप्राण्यांचे अवयव महाराष्ट्रातून आणण्यात आले होते. त्या वृद्धाची चौकशी करण्यात येत असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
मंत्र-तंत्रासाठी वापर
पवन व त्याचे अनेक साथीदार वन्यप्राण्यांच्या अवयवांच्या विक्रीसाठी गाणगापूर, दत्तरगी बागम्मा मंदिर परिसरात येतात. वर्षातील किमान सहा महिने ते कर्नाटकात असतात. आपल्याजवळील वन्यप्राण्यांचे अवयव संपले की पुन्हा अवयव गोळा करण्यासाठी नाशिकला परततात. खासकरून वास्तू व गूढ विद्येसाठी यामधील अनेक अवयवांचा वापर केला जातो. त्यासाठीच या अवयवांना मागणी आहे.









