कोल्हापूर वुई केअर व ‘एनजीओ’ कंपॅशन 24 आयोजन; दिगंबर जैन बोर्डिंग येथे होणार उत्सव; 105 रानभाज्यांचा समावेश
कोल्हापूर प्रतिनिधी
सह्याद्री डोंगररांगा कोकण आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील अत्यंत दुर्गम भागात जंगलात संपूर्णतः नैसर्गिकरित्या उगवणाया आणि सहजगत्या उपलब्ध होणाया आरोग्यकारी, पौष्टिक व औषधी अशा या रानभाज्यांची ओळख सर्वांना व्हावी. तसेच निसर्गप्रेमींनी या भाज्या परसबागेत लावून त्यांना त्याचे फायदे मिळावेत, यासाठी एनजीओ कंपॅशन 24 आणि कोल्हापूर वुई केअरतर्फे रविवार (दि.2) व सोमवार (दि.3) असे दोन दिवस ‘रानभाज्या उत्सव’चे दिगंबर जैन बोर्डिंगच्या चतुरबाई हॉल येथे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कोल्हापूर वुई केअरचे अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.
धोंड म्हणाले, महात्मा गांधी जयंती आणि स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव-2022चे औचित्य साधून जवळपास 105 रानभाज्यांचा समावेश या उत्सवात करण्यात आला आहे. यामध्ये मुरुडा, सकाळू ( वृक्षांवर उगवणारा अळू ), तीनतोंडी, मांजरी / उंदराचे कान, करशिंगी ( चारफुटी शेंगा), पपनस ( बंपर फळ ), सफेद मुसळी अशा अत्यंत दुर्मिळ असणाया रानभाज्या तसेच काटवलं, दिंडा, कुडा, आंबुशी पाथरी,कुरडू, शेवगा, बांबू कोंब, आंबट चुका, चाकवत, केना, पानांचा ओवा, कपाळफोडी, चिवळ, आघाडा, काटेमाट, घोळभाजी, अंबाडी, सुरण, टाकळा ,मटारू, भुई आवळा, कवठं, भारंगी या औषधी गुणांनी युक्त आरोग्यवर्धक असलेल्या अनेक रानभाज्या या ठिकाणी पहायला मिळणार आहेत. लोकांना रानभाज्यांची ओळख होण्यासाठी मोहन माने यांच्या संकल्पनेतून रानभाज्यांचे हे माहितीपूर्ण प्रदर्शन आयोजित केले आहे. अनेक रानभाज्यांची बियाणे व तरू वापरुन जवळपास 75 रोपे तयार करण्यात आली आहेत. ते प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.
रविवार (दि.2) सकाळी 10 वाजता या प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख उपस्थिती शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, वनस्पती शास्त्रज्ञ डॉ. मधुकर बाचुळकर, रत्नागिरीचे अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, गडहिंग्लजचे प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे, विभागीय कृषी अधीक्षक उमेश पाटील आदींची असणार आहे. सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. यावेळी डॅ. मधुकर बाचुळकर, निसर्ग मित्र संस्थेचे अनिल चौगुले, डॉ. अशोक वाली, भाग्यश्री कलघटगी, गार्डन क्लबच्या अध्यक्षा कल्पना सावंत, वृक्षप्रेमीचे अध्यक्ष अमोल बुढ्ढे, सुशील रायगांधी आदी उपस्थित होते.