आंबेडकरनगर येथील घटनेने खळबळ : एपीएमसी पोलिसांनी लावला छडा, चौघांना अटक
बेळगाव : अनैतिक संबंधाची माहिती पतीला मिळाली. त्यामुळे पतीचा काटा काढण्याचा पत्नीने आपल्या प्रियकर व त्याच्या दोन साथीदारांबरोबर कट रचला. त्यानंतर झोपेच्या गोळ्या देऊन पतीचा गळा आवळून खून केला. मृतदेह चोर्ला घाटात फेकून दिल्यानंतर स्वत:च पोलीस स्थानकात जाऊन बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली. मात्र त्यांचा हा कट तीन महिन्यांनंतर उघडकीस आला असून याप्रकरणी एपीएमसी पोलिसांनी पत्नीसह प्रियकर व आणखी दोघांना अटक केली आहे. संध्या रमेश कांबळे (वय 35, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर), तिचा प्रियकर बाळू बिर्जे याच्यासह दोघा साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. संध्या आणि बाळू यांचे अनैतिक संबंध होते. हे अनैतिक संबंध उघडकीस आले. रमेश याला या दोघांचे संबंध असल्याचे कळले. त्यामुळे बऱ्याचवेळा संध्या आणि रमेश यांच्यात खटके उडायचे. पतीला आता आपण संपविले तरच आपले अनैतिक संबंध राहणार, असे संध्या हिने बाळू याला सांगितले. त्यानंतर बाळूने दोन साथीदारांसह खून करण्याचा कट रचला. रमेशला पत्नीने झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर त्याचा गळा आवळून या सर्वांनी खून केला. खुनानंतर त्याचा मृतदेह फेकून देण्यात आला आहे. त्याचा शोध आता पोलीस घेत आहेत. यासाठी एक पथक नेमण्यात आले असून चोर्ला घाटात मृतदेह टाकल्याचा संशय आहे.
अन् संशयाची सुई बळावली
मयत रमेश कांबळे हा पेंटर काम करत होता. तो 28 मार्चनंतर अचानक बेपत्ता झाला. त्यानंतर पत्नी काही दिवसांनी पती बेपत्ता झाल्याची फिर्याद देण्यासाठी एपीएमसी पोलीस स्थानकात गेली. यावेळी पोलिसांनी पती कधी गेला आहे? जाताना त्याने काय सांगितले? अशी चौकशी केली. यावर संध्या हिने तो एका महिलेला घेऊन पळून गेला, असे सांगितले. मात्र महिलेचे नाव तिला सांगता आले नाही. त्याचवेळी पोलिसांना संशय आला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करताना हा कट उघडकीस आला.









