रामदुर्ग तालुक्यातील घटना : अनोळखी मृतदेहाची ओळख पटली
बेळगाव : रामदुर्ग तालुक्यातील के. जुन्नीपेठजवळील मलप्रभा नदीवरील पुलानजीक आढळून आलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटली आहे. पत्नीनेच दोघा जणांच्या मदतीने पतीचा काटा काढल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले असून या प्रकरणी रामदुर्ग पोलिसांनी पत्नीसह तिघा जणांना अटक केली आहे. साबप्पा लक्ष्मण मादर (वय 26), फकिराप्पा सोमप्पा कणवी (वय 22) दोघेही राहणार खानपेठ, ता. रामदुर्ग, करेव्वा ऊर्फ कमलव्वा इराप्पा आडीन (वय 33) रा. अम्मीनभावी, जि. धारवाड अशी अटक करण्यात आलेल्या तिघा जणांची नावे आहेत. रामदुर्गचे पोलीस निरीक्षक विनायक बडीगेर, उपनिरीक्षक सविता मुन्याळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.
8 जुलै रोजी सकाळी 6.30 वाजता के. जुन्नीपेठजवळ हर्लापूरहून रामापूरकडे जाणाऱ्या रोडवर आढळून आलेला मृतदेह इराप्पा यल्लाप्पा आडीन (वय 35) राहणार अम्मीनभावी, ता. धारवाड याचा असल्याचे उघडकीस आले आहे. तो जालीकट्टी गावचा जावई होता. 7 जुलै रोजी रात्री 11.30 वाजता यल्लाप्पाला घटप्रभा नदीवरील पुलानजीक बोलावून टॉवेलने गळा आवळून त्याचा खून करण्यात आला आहे. त्यानंतर दगडानेही त्याला ठेचण्यात आले आहे. जिल्हा टेक्निकल सेलच्या मदतीने खून झालेल्या इराप्पाच्या पत्नीबरोबर सतत संपर्कात असणाऱ्या साबप्पा मादर व फकिराप्पा कणवी यांना अटक करण्यात आली आहे.









