मायणी :
कलेढोण (ता. खटाव) येथील बेघरवस्तीत वास्तव्यास असणाऱ्या एका महिलेचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना गुरुवार दि. 20 मार्च रोजी उघडकीस आली. चारित्र्यावरील संशयांच्या कारणाने पतीने पत्नीला संपल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी वडूज पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे. खून करून पलायन केलेल्या महिलेच्या पतीस वडूज पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले.
गावालगत असणाऱ्या बेघरवस्तीत भाड्याच्या घरात राहणाऱ्या सौ. मंगल ऊर्फ सुमन संतोष जाधव (वय 40, मूळ रा. नृसिंहपुर, ता. वाळवा, जि. सांगली) या कुटुंबासह कलेढोण येथे मजुरीनिमित्त वास्तव्यास होते. सकाळच्या सुमारास नातेवाईक घरासमोरून मॉर्निंग वॉकसाठी जात असताना घराचा दरवाजा उघडा दिसल्याने पाहिले असता संबंधित महिला मृतावस्थेत आढळून आली.
या संदर्भात माहिती मिळताच वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अमित शिंदे, स.पो.नि विक्रांत पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असता मृत महिलेच्या गळ्यावर गळा आवळल्याच्या खुणा दिसून आल्या. त्यामुळे मंगल उर्फ सुमन संतोष जाधव यांचा गळा आवळून खून करण्यात आल्याची बाब समोर आली. संबंधित महिलेचा पती हा मंगल यास मारहाण करत असल्याची व संशयित वृत्तीचा असल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली. तसेच घटनास्थळावरून संबंधित महिलेचा पती फरार असल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत पलायन करणाऱ्या मृत महिलेचा पती संतोष सखाराम जाधव (वय 45) यास दोन तासांमध्येच इस्लामपूर (जि. सांगली) येथून मोठ्या शिताफीने अटक केले.
याप्रकरणी परशुराम माने यांनी फिर्याद दिली असून मृत महिलेचा कुटीर रुग्णालय कलेढोण येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. तसेच दहिवडी उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, वडूज पोलीस निरीक्षक घन:श्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. विक्रांत पाटील अधिक तपास करत आहेत.
- चार तासात आरोपी जेरबंद
वडूज पोलीस ठाणे अंतर्गत खूनप्रकरणातील आरोपी संतोष सखाराम जाधव हा कलेढोण येथे खून करून इस्लामपूरच्या दिशेने आलेले समजले. तत्काळ इस्लामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय हारुगडे व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी नाकाबंदी लावून आरोपीस केवळ चार तासात ताब्यात घेऊन वडूज पोलिसांकडे सुपूर्द केले.








