पती दुसऱयांदा विवाहाच्या तयारीत : विजय सरदेसाई यांचा चालक असल्याचा तारा केरकर यांचा दावा
प्रतिनिधी /पणजी
आमदार विजय सरदेसाई यांचा वाहनचालक असलेल्या इसमाने तोंडी तीन तलाक च्या माध्यमातून पत्नीला हाकलून दिले असून पुढील महिन्यात तो दुसऱयांदा विवाह करण्याच्या तयारीत आहे. अशा व्यक्तीस सरदेसाई यांनी त्वरित वठणीवर आणावे, अन्यथा त्यांच्याच पाठिंब्यावर तो सदर कृत्य करत असल्याचे समजले जाईल, असा इशारा समाजकार्यकर्त्या तारा केरकर यांनी दिला आहे.
शहनाज मन्सूर या महिलेचा 2007 विवाह झाला होता. या दरम्यान त्यांना तीन मुले झाली. त्यानंतर दोन वर्षापूर्वी त्याने पत्नीला तोंडी तलाक देऊन हाकलून लावले. तिला मारहाण केली तसेच पुन्हा घरात येण्याचा प्रयत्न केल्यास जाळून मारण्याची धमकीही दिली. दोन्ही मुलांना त्याने स्वतःकडे ठेवले. मुलीला स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे नऊ वर्षांच्या मुलीला घेऊन ती महिला मुंबईला गेली. तेथे उदरनिर्वाहासाठी घरोघरी भांडी धुणे यासारखी कामे करून तिने कशीबशी दोन वर्षे सारली. तेथून तिने अनेकदा नवऱयाशी संपर्क करण्याचे प्रयत्न केले. परंतु त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही.
सध्या तिला पतीच्या दुसऱया विवाहाबद्दल माहिती मिळाल्याने ती गोव्यात आली. त्यावेळी आलम सय्यद नामक व्यक्तीच्या मदतीने तो दुसरा विवाह करत असल्याचे तिला समजले. हा सय्यद सुद्धा विजय सरदेसाई यांचाच विश्वासू कार्यकर्ता असून सदर महिलेने या विवाहाबद्दल त्याला विचारले असता अश्लील शिवीगाळ करून त्यानेही तिला खुनाची धमकी दिली आहे. त्यानंतर तिने सरदेसाई यांची भेट घेण्याचे प्रयत्न केले, परंतु वरील दोन्ही इसमांनी तिला त्यांच्यापर्यंत पोहोचू दिले नाही. या प्रकरणी नंतर सदर महिलेने पोलीस तक्रार केली आहे. मात्र तेथेही तिला न्याय मिळालेला नाही. त्यामुळे सदर महिलेला कुणीच वाली राहिलेला नाही. तिला तिच्या दोन्ही मुलांनाही भेटू दिले जात नाही. घरी गेल्यास सासू, दीर यांच्याकडून हाकलून लावण्यात येते. ही एकंदर परिस्थिती पाहता तिच्या जिवालाही धोका असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सध्या आपण तिला घरी आसरा दिला आहे, अशी माहिती केरकर यांनी दिली.
’तीन तलाक’ द्वारे पत्नीला घटस्फोट देण्यास कायद्याने बंदी असताना आजही असे प्रकार घडत आहेत ते सुद्धा समान नागरी कायदा असलेल्या गोव्यासारख्या राज्यात घडतात ही खरोखरच दुर्दैवी गोष्ट आहे, असे केरकर म्हणाल्या. त्यामुळे या प्रकरणी आता सरदेसाई यांनीच पुढाकार घेऊन पीडित महिलेला न्याय मिळवून द्यावा, अन्यथा तिच्या जिवाचे बरेवाईट झाल्यास त्याला पूर्णतः सरदेसाईच जबाबदार असतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.









