उत्तर गोवा अधीक्षकांकडे तक्रार दाखल
पणजी : वाळपई येथील एका विधवेच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन एका पोलिस हवालदाराकडून तीचा लैंगिक छळ करण्याचा प्रकार समोर आला आहे. वाळपई पोलिसांकडून यासंबंधी केवळ अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संबंधीत पोलिस हवालदाराच्या दहशतीपुढे या प्रकरणाची चौकशी करण्यास पोलिस विशेष रस दाखवत नसल्याचे दिसून येताच सदर महिलेने आता उत्तर गोवा पोलिस अधिक्षकांकडे या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे.पीडित महिला राहत असलेल्या ठिकाणी तीने आपल्या दोन खोल्या भाडेपट्टीवर दिल्या होत्या. यापैकी एका खोलीतील भाडेकरू महिन्यांचे भाडे न देता आपले सामान तिथेच ठेवून पसार झाला होता. त्यामुळे ही महिला पोलिस तक्रार दाखल करण्यासठी गेली होती, या महिलेच्या तक्रारीवरून सदर हवालदार तिथे पोहचला आणि त्याने ही महिला एकटी असल्याची संधी साधून तीच्याशी संधान जुळवले आणि तीचा लैंगिक छळ सुरू केला. पीडित महिला ही गोमंतकीय नसून शेजारील कर्नाटक राज्यातील असल्यामुळे पोलिस हवालदाराच्या या छळाबाबत आणि मारबडवबाबत तीने तक्रार केली नाही. या परिसरात बहुतांश सर्वच परप्रांतीय लोक भाडेपट्टीवर राहत असल्याने पोलिसांची पंगा घेतल्यास सगळ्यांनाच त्रास होईल, या भीतीने ही महिला हा आत्याचार सहन करत राहीली.
संबंधीत हवालदार हा सत्तरी तालुक्यातीलच असून तो पूर्वी वाळपई पोलिस स्थानकावरच होता. तिथेच तो स्वत: सेवेत असल्यामुळे त्या महिलेला तक्रार करण्याचे धाडस झाले नाही. आता त्याची बदली पणजी जीआरपीत झाल्यामुळे या महिलेने धाडस करून तक्रार दाखल केली आहे. सदर महिलेच्या तक्रारीवर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे. विशेष म्हणजे सदर महिलेने स्वेच्छेने या हवालदाराकडे लैंगिक संबंध ठेवल्याची तिची जबानी नोंदवण्यात आली आहे. हा प्रकार कुणीतरी तीच्या लक्षात आणून देताच ती महिला प्रचंड मानसिक तणावाखाली गेली. आता तीने पुन्हा एकदा नव्याने तक्रार दाखल केली असता पुन्हा एकदा पोलिसांनी तसाच पद्धतीने तीची जबानी नोंदवून अदखलपात्र गुन्हा नोंद केला आहे. अखेर पीडित महिला पोलिस अधिक्षकांना भेटून तीने यासंबंधीचा सगळा प्रकार कथन केला आहे. तीला न्याय देण्याचे आश्वासन पोलिस अधिक्षकांनी दिले आहे. संबंधीत हवालदार हा विवाहीत आहे तरिही त्याने तीला लग्नाचे आमिष दाखवून तीच्या सोबत लैंगिक संबंधी ठेवले आणि तीची या संबंधांना मंजूरी होती, असे भासवून पोलिस हे प्रकरण रफादफा करण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय सदर महिलेने व्यक्त केला आहे.