म्हसवड :
कुळकजाई या गावाला माण तालुक्यात मिनी महाबळेश्वर या नावाने ओळखले जाते. शेडगेवाडी, कुळकजाई या गावाला जाण्यासाठी एकच घाटमाथ्याचा रस्ता असून तो खराब व चिखलाचा असल्याने वाहन चालवता येत नसल्याने कुळकजाई येथील विनय घोरपडे याने शेडगेवाडीवरुन कुळकजाईला येताना चक्क दुचाकी खांद्यावर घेऊन चिखलातून मार्ग काढला. त्यामुळे माण तालुक्यातील या दयनीय रस्त्याची व प्रति बाहुबली विनय घोरपडेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.
माण तालुक्यातील कुळकजाई येथील विनय घोरपडे या तरुणाने रस्त्याच्या दुरावस्थेमुळे चक्क मोटारसायकल खांद्यावर घेऊन चालत गेला. त्याचा हा व्हिडिओ चांगलाच गाजत असून ‘बाहुबली’ चित्रपटातील गाणे या फोटोला, व्हिडिओला जोडल्याने सोशल मीडियावर या प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.
विनय हा काही कामानिमित्त शेडगेवाडी येथे गेला होता. तिथून परत कुळकजाईला येताना रस्त्याची दुरवस्था झाली होती. त्यामुळे मोटारसायकल चालविताना अडचण येत होती. गाडीवर नियंत्रण ठेवणे अवघड जात होते. तसेच गाडीची चाके रुतत होती. शेवटी काही पर्याय नाही हे पाहून विनयने गाडी एका चाकावर उभी केली. गाडीला खांदा लावून गाडी खांद्यावर घेतली. गाडीचे ओझे खांद्यावर घेऊन स्वतःचा तोल सांभाळत त्याने तिथून गाडी बाहेर काढून आपल्या घरी नेली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.
दरम्यान, पावसाच्या तडाख्यानंतर दुष्काळी माण तालुक्यातील रस्त्यांचे पितळ यानिमित्ताने उघडे पडले आहे. तसेच संबंधित विभागाचा कारभारही चव्हाट्यावर आला आहे. आता तरी संबंधित यंत्रणा या रस्त्याची सुधारणा करतील, अशी चर्चा सर्वत्र आहे.








