पावसाळा सुरू होत असल्याने रस्त्याचे काम पूर्ण होण्याविषयी शंका : वाहतूक कोंडी, प्रवाशांचे हाल
वार्ताहर/उचगाव
बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील हिंडलगा-आंबेवाडी फाटा ते सुळगा (हिं.) हनुमान मंदिरपर्यंतच्या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. मात्र पावसाळ्याला प्रारंभ झाला तरी अद्याप या रस्त्याचे काम पूर्णत्वाला गेले नसून काम अतिशय संथगतीने सुरू असल्याने पावसाळ्यात प्रवाशांची मोठी कुचंबणा व हाल होणार असल्याच्या तक्रारी प्रवासीवर्गातून करण्यात येत आहेत. सदर काम केव्हा पूर्ण होणार, असाही प्रश्न आता प्रवासीवर्गातून उपस्थित करण्यात येत आहे. बेळगाव-वेंगुर्ले मार्गाची झालेली दुर्दशा आणि प्रवासी व नागरिकांचे होणारे रोजचे हाल पाहता यावर आवाज उठविण्यासाठी आणि सदर रस्त्याचे चौपदरीकरण करावे, यासाठी अनेकवेळा जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदने देण्यात आली. बेळगाव-बाची भागात येणाऱ्या सात ग्र. पं.चे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य तसेच नागरिकांच्या वतीनेही निवेदन देऊन विनंती करण्यात आली होती. मात्र अद्याप म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. कामाची गती कासवाच्या गतीने चालू असून, ऐन पावसाच्या तोंडावरती संथगतीने चाललेले काम पाहता पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होणार की नाही याची शंकाच असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.
बेळगाव-बाची रस्त्याची अक्षरश: दुर्दशा
बाची-रायचूर हा कर्नाटकातील महामार्ग आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याने, शासनाने बेळगाव-रायचूर या पट्ट्यातील रस्त्याचे दुपदरीकरण करून बेळगाव-बाची मार्गाकडे दुर्लक्ष केले आहे. सध्या या रस्त्यावरून चालणेही मुश्किल झाले आहे. रोज हजारो प्रवाशांची या बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरून कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा अशा तीन राज्यांमध्ये मोठ्या संख्येने ये-जा असते. मात्र बेळगाव-बाची या 15 किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अक्षरश: दुर्दशा पाहता हा रस्ता पार करणे आणि या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ नागरिक व प्रवासीवर्गावर आली आहे.
खराब रस्त्यामुळे वाहतूक कोंडी-अपघातांच्या घटना
या खराब रस्त्यावरून सातत्याने घडणारे अपघात, खराब रस्त्यामुळे वाहनांची होणारी नादुरुस्ती या सर्व समस्यांना नागरिक, प्रवाशांना तोंड द्यावे लागत आहे. सध्या या मार्गावरून एकेरी प्रवास चालू आहे. एका भागाची दुरुस्ती चालू असून राहिलेल्या उर्वरित भागातून वाहतूक होत असताना अनेकवेळा वाहतुकीची कोंडी होताना दिसत आहे. बेळगाव-वेंगुर्ले मार्ग तीन राज्यांना जोडणारा असल्याने या रस्त्यावर सातत्याने रहदारीची कायम कोंडी होत असते. तशात आता पाऊस आणि चाललेले काम यात चिखल आणि इतर समस्यांना प्रवाशांना तोंड द्यावे लागणार आहे. यासाठी या भागाच्या लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष घालून महिन्याभरात रस्त्याचे काम पूर्णत्वाला कसे जाईल, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी असंख्य प्रवासी व नागरिकांतून करण्यात येत आहे.
15 कि. मी. अंतरासाठी तासाचा प्रवास
या मार्गावरून रोज हजारो प्रवासी ये-जा करतात. मात्र या रस्त्याची दुर्दशा पाहता या रस्त्यावरून प्रवास करण्यासाठी बेळगाव-बाची या 15 किलोमीटर रस्त्याच्या अंतरासाठी तास ते दीड तास घालवावा लागतो. पावसाळ्यात मोठे खड्डे आणि खड्ड्यांतून साचणारे पाणी यांचा सामना करत नागरिकांनी कसेबसे मागील पावसाळा घालवला. मात्र यावर्षी येणारा पावसाळाही या खराब रस्त्यावरूनच घालवण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे.









