सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकारला फटकारले
वृत्तसंस्था/ तामिळनाडू
तामिळनाडूचे वरिष्ठ पोलीस अधिकारी एच.एम. जयराम यांना अटक करण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी तीव्र प्रतिक्रिया दिली. न्यायालयाने अटकेच्या आदेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या निलंबनालाही ‘हतोत्साहित करणारी कारवाई’ ठरविले आहे. 28 वर्षांपासून सेवेत असलेला अधिकारी तपासात सहकार्य करत असताना निलंबनाची आवश्यकता काय अशी विचारणा खंडपीठाने तामिळनाडू सरकारला केली.
हे प्रकरण एका कौटुंबिक वादातून सुरू झाले होते. वनराजा नावाच्या इसमाच्या मुलीने 22 वर्षीय युवकासोबत प्रेमविवाह केला होता. वनराजाने बडतर्फ कॉन्स्टेबल महेश्वरीशी संपर्क साधत मुलीला परत आणण्यासाठी मदत मागितली होती. महेश्वरीने पोलीस अधिकारी जयराम यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी आमदार पूवई जगन मूर्ती यांना यात सामील केले होते.
युवक अन् युवतीचा शोध न लागल्याने या समुहाने त्याच्या 16 वर्षीय भावाचे अपहरण केले होते. याप्रकरणी दबाव वाढल्यावर अल्पवयीन मुलाची जयराम यांच्या अधिकृत कारमधून मुक्तता करण्यात आली होती. ही कार एक पोलीस कॉन्स्टेबल चालवत होता आणि कारमध्ये वनराजा आणि महेश्वरी देखील होते असे पोलिसांचे सांगणे आहे.









