सर्वसामान्य ग्राहकांच्या, सर्वसामान्य जनतेच्या पानावर असलेल्या पदार्थांमध्ये आमटी असो वा भाजी किंवा कोशिंबीर यामध्ये टोमॅटो नसला तर त्याचे जणू काही जेवण पूर्ण होत नाही. बाजारात 10 ते 20 रूपयांच्या घरात आनंदात राहणाऱ्या, राबणाऱ्या टोमॅटोने सध्या बराच भाव खाल्ला. टोमॅटोचे दर 3 आठवड्यांपूर्वी रू. 30 प्रति किलो होते. सध्या 5 पटीने त्याचे भाव पोहोचले आणि सर्वसामान्य जनतेसाठी तो एवढा कसा काय रूसून बसला? संपूर्ण देशात लाखो टन टोमॅटो तयार होतो. देशात असे एकही राज्य नाही जिथे टोमॅटो तयार होत नाही. असे असूनही टोमॅटोचे दर गगनाला भिडण्याचे कारण तरी काय? टोमॅटोचे उत्पादन घेण्यासाठी शेतकरी राबराब राबतो. बाजारात जेव्हा सर्वसामान्य नागरिक टोमॅटो खरेदी करतो त्याचा दर साधारणत: 25 ते 30 रू. प्रतिकिलो असा असतो. आणि शेतकऱ्याला? त्याच्या हाती 1 रू. किंवा 50 पैसे प्रति किलो हा भाव पडतो. शेतीवाडीवरून टोमॅटे बाजारात पोहोचेपर्यंत वाहतुकीला येणारा खर्च बाजारात आणल्यानंतर कृषी पणनचे अधिकारी आणि अडत व्यापारी यांच्या जाचाला शेतकऱ्याला तोंड द्यावे लागते. एवढे महिने कष्ट घ्यावेत आणि मोठ्या प्रमाणात आलेल्या उत्पादनास बाजारभाव मिळत नाही उलटपक्षी वाहतुकीचे भाडेदेखील वसूल होत नाही तर मग अशा शेतकऱ्याने शेती करावी कशाला? शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्त्या करीत असतो त्याचे कारण नेमके हेच. प्रत्येक घटनेच्या मुळाशी न जाता अनेक राजकीय नेते प्रत्येक घटनेचे राजकीय भांडवल करीत आहेत. राजकीय नेते अशा घटनांवर आपली पोळी भाजत राहिले आणि शेतकरी बिच्चारा अत्यंत हालअपेष्टा काढीत मरत राहिला. ज्या टोमॅटेने शेतकऱ्यांना आत्महत्त्या करण्यास भाग पाडले तोच टोमॅटो सध्या शेतकऱ्याला फार मोठा श्रीमंत करण्यास निघालेला आहे. एका शेतकऱ्याने एका दिवसात रू. 38 लाख कमविले अशा सुखद धक्कादायक बातम्या सोशल मीडियावरून प्रसारीत झाल्या. सध्या अनेक शेतकऱ्यांना टोमॅटेची लॉटरी लागली आहे. ज्याठिकाणी 50 पैसे किलो दराने टोमॅटो खरेदी केला जायचा त्याठिकाणी सध्या शेतकऱ्यांना 50 ते 60 रू. प्रति किलो दर मिळत आहे. किरकोळ बाजारात टोमॅटो रू. 120 ते 150 प्रति किलोने विकला जात आहे. या देशात जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार ही नित्याचीच बाब आहे. सरकार कोणाचेही असो सर्वसामान्य नागरिक तथा ग्राहक हा घाऊक वा अडत व्यापाऱ्यांच्या टोळधाडीत कुरतडला जात आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर हे भरती आल्यासारखे एकदम वाढतात व ओहोटी लागल्यासारखे एकदम कोसळतात. अडत व्यापारी वा घाऊक व्यापारी कधीही फसला जात नाही वा नुकसानीत जात नाही. नागविला जातो तो शेतकरी. सध्या टोमॅटो दरवाढीने बराच लाल झालेला आहे. सर्वसामान्यांच्या ताटातून तो गायब झालेला आहे. कांदा, टोमॅटो आणि बटाटा हे असे प्रकार आहेत जे गोरगरीबांचे अन्न आहे. टोमॅटे 20, 25 रू. प्रति किलो दराने कोणाला नको होता त्याजागी तो 150 चा भाव खाऊ लागला. कशामुळे? टोमॅटोचे उत्पन्न जर घटले आहे असे म्हणता तर मग बाजारात सर्वत्र टोमॅटोच्या ज्या राशी दिसतात त्या कुठून आल्या. या देशात बाजारभाव नेमका कोण ठरवितो? कधी नव्हे तो सध्या शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाला बाजारभाव मिळत आहे. इतरांनी श्रीमंत व्हावे. बळीराजाने कोणते पाप केलेय! त्याने का नाही श्रीमंत व्हावे? सध्या टोमॅटेच्या वाढत्या भावाचा अवघ्याच काही शेतकऱ्यांना लाभ होणार. साधारणत: दरवर्षी एप्रिलनंतर भाज्यांचे उत्पादन घटते. ज्या भाज्या मिळतात त्यांचा दर्जाही खालावलेला असतो. टोमॅटोने सध्या भाव खाल्लेला आहे. तो सर्वसामान्य ग्राहकांवर रूसून बसण्यास व्यापारीच जबाबदार आहेत. ढोबळी मिरचीनेही भाव खाल्लेला आहे मात्र वाढत्या भावाचा खरोखरच सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत त्याचा लाभ पोहोचतो का? की शेतकऱ्याच्या नावाने अडत आणि घाऊक व्यापारीच खोऱ्यांनी पैसा ओढीत आहेत! जुलैच्या अखेरीस बाजारात नव्या भाज्या, फळभाज्या विक्रीस येतील त्यावेळी टोमॅटोचे भाव कड्याकपारीवरून पाऊस पडावा तसे ते गडगडत राहणार. अशावेळी शेतकऱ्यांना कोण सांभाळणार? कारण सध्या टोमॅटोनी जे काही भाव खाल्लेत ते तात्पुरतेच आहेत. यापूर्वीदेखील टोमॅटोने असेच भाव खाल्ले होते. कांद्याने साऱ्या जनतेचा वांदा केला होता. हा सारा प्रकार घडण्यामागे काही दडून बसलेली व्यापार तत्वे असावीत. राज्य सरकारांनी यात लक्ष घालणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचा योग्य भाव मिळणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या खांद्यावर स्वार होत व्यापारी श्रीमंत होऊ लागलेत ते केवळ जनतेला नव्हे तर देशाला लुबाडायला निघालेत. आंध्रप्रदेशातील एका काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्याने आपल्या मळ्यातील टोमॅटो विकून रू. 30 लाख कमविले. त्या शेतकऱ्याकडे पैसे आल्याचे पाहून दोघांनी त्याला लुटले आणि त्याची हत्त्याही केली. असा प्रकार गुऊवारी उघडकीस आला. एकंदरितच टोमॅटोसारखेच जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रित असणे आवश्यक आहेत. या देशातील शेतकऱ्याला लाभ व्हावा, शेतकरी श्रीमंत व्हावेत परंतु अचानक अनपेक्षित टोमॅटोची लॉटरी लागल्यानंतर शेतकऱ्यांची मानसिकता बिघडणार तर नाही? शेतकऱ्याच्या कष्टाचे चीज व्हावे. मात्र अचानक लॉटरी लागल्याने हर्षवायू होऊ शकतो. टोमॅटेचे भाव वाढणे हे तात्पुरते, हंगामी नाटक आहे. थोड्याच दिवसांमध्ये टोमॅटोचे भाव पुन्हा गडगडगडतील आणि बिचारा शेतकरी अडचणीत येईल. टोमॅटोला सोन्याचा भाव मिळत आहे या समजुतीने अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली आणि उत्पादन वाढले तर पुन्हा प्रति किलोमागे केवळ 1 रू. हा भाव मिळू शकतो. त्यामुळेच जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे नेहमीच नियंत्रणात असावे. केंद्रसरकारने बुधवारी या प्रकरणाची गंभीर दखल घेत जो काही हस्तक्षेप केला आणि दक्षिण भारतातून मोठ्या प्रमाणात टोमॅटो खरेदी करून तो सर्वसामान्य ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासंदर्भात जे पाऊल उचललेले आहे ते योग्यच ठरणारे असेल. पेट्रोलपेक्षादेखील टोमॅटोचे भाव वाढावेत आणि 500% नी भाव टोमॅटेचे वाढावेत हे एक आश्चर्य आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश व तामिळनाडूच्या काही भागात टोमॅटोचे सर्वाधिक उत्पादन आहे. नाफेडमार्फत टोमॅटो खरेदी करून ते मर्यादित दरात उपलब्ध करून देण्याचा केंद्राने संकल्प सोडलेला आहे त्यातून सर्वसामान्य ग्राहकांना मर्यादित दरात टोमॅटो उपलब्ध केले जातील. टोमॅटो मुबलक प्रमाणात बाजारात उपलब्ध झाल्यानंतर लागलीच कांदा गायब होण्याची शक्यता आहे. सध्या तूरडाळीनेदेखील बराच भाव खाल्लेला आहे. देशातील अनेक महत्त्वाची व मोठी गोदामे तूर व तूरडाळीने भरलेली आहेत. तरीदेखील तूरडाळीचा काळाबाजार सुरू झालेला आहे व त्यातून हे भाव मोठमोठ्या उड्या मारीत आहेत. सरकारने वेळीच लक्ष घालून काळाबाजार करणाऱ्यांना अद्दल घडवायला नको? लाल रंगाच्या टोमॅटोने भाव खाल्ले आणि सर्वसामान्य व मध्यमवर्गीयांना या दुर्लक्षित फळभाजीकडेदेखील गांभीर्याने पहावे लागले. टोमॅटेच्या वाढीव दराचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसलेला आहे. टोमॅटोच्या रूसव्या फुगव्याचे कारण केंद्र शोधून काढील काय?
Previous Articleज्ञानी लोकांना विषय गलितगात्र करून सोडतात
Next Article उत्तर भारतात पर्जन्यवृष्टीचा प्रकोप
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








