काही तरी खास आहे या ठिकाणी
जगातील अनेक ऐतिहासिक स्थळ वाद निर्माण करणारे ठरतात. याचे रहस्य जाणून घेण्याचा प्रयत्न जितका केला जातो तितकेच ते अधिक गडद होत जाते. इंडोनेशियाच्या गुनुंग पदांग या अनोख्या स्थळाने संशोधकांना अनेक वर्षांपासून कोड्यात पाडले आहे. हे एक प्राचीन पिरॅमिड आहे का नैसर्गिक संरचना या प्रश्नाचे उत्तर अद्याप सापडलेले नाही. पृथ्वीवरील हे सर्वात जुने पिरॅमिड असू शकते असे अनेक तज्ञांचे मानणे आहे. हे स्थळ 20 हजार वर्षांपेक्षाही अधिक जुने आहे.
इंडोनेशियाच्या पश्चिम जावा येथे स्थित या स्थळावर पर्वतीय पायऱ्या असून ज्या मोठमोठ्या खडकांनी झाकोळलेल्या आहेत. स्थानिक वंदतेनुसार हे एका कालौघात नष्ट झालेल्या संस्कृतीशी संबंधित स्थळ आहे. उत्खननातून पृष्ठभागाखाली लपलेले कक्ष आणि संरचना समोर आल्या आहेत.
25 एकरमध्ये फैलावलेले हे स्थळ सर्वप्रथम 1914 मध्ये पाहिले गेले होते. परंतु याचे उत्खनन आणि संशोधन 1970 मध्ये सुरू झाले. हे दक्षिणपूर्व आशियातील सर्वात मोठ्या मेगालिथ स्थळापैकी एक मानले जाते. ज्वालामुखीय खडकांनी याची निर्मिती झाली असून जिनासदृश संरचना देखील आहे. निर्मितीत वापरण्यात आलेले दगड हे बेसॉल्ट स्तंभ आहेत. हे स्तंभ नैसर्गिक स्वरुपात आढळून येत असतात. त्यांना प्राचीन बांधकाम कामगारांनी आकार दिला होता.
हे स्थळ एक पिरॅमिड असल्याचे मानले जाते. काही संशोधकांचा गुनुंग पडांग एक प्राचीन पिरॅमिड असून ते वृक्षांनी झाकोळलेले असल्याचा तर्क आहे. गुंनुग पडांगचे वयोमान निर्धारित करणे पुरातत्वतज्ञ आणि भूवैज्ञानिकांदरम्यान अत्यंत चर्चेचा विषय राहिला आहे. रेडिओकार्बन डेटिंगद्वारे हे स्थळ 5 हजार वर्षांपेक्षा अधिक जुने असल्याचे समजले आहे. यामुळे हे इजिप्तच्या पिरॅमिडपेक्षाही जुने ठरते. काही संशोधकांनुसार हे स्थळ 20 हजार वर्षांपर्यंत जुने असू शकते. हा वादग्रत दावा स्थळाच्या खोल थरांवर आधारित आहे.
गुनुंग पडांग रहस्यात बुडालेले आहे. याचा उद्देश आणि निर्मितीविषयी अनेक सिद्धांत आहेत. ही एक प्राचीन वेधशाळा होती असे काही लोकांचे मानणे आहे. याचा वापर खगोलीय घटनांचा वेध घेण्यासाठी करण्यात आला असावा. तर हे पूजास्थळ होते असे इतरांचे मानणे आहे. स्थळाचा लेआउट आणि कलाकृती हे एक धार्मिक केंद्र असू शकते असे संकेत देतात. त्या काळातील बांधकाम कामगारांना अत्यंत प्रगत इंजिनियरिंग तंत्रज्ञान अवगत होते असे काही संशोधकांचे मानणे आहे.
आधुनिक शोधाने गुनुंग पदांगच्या अध्ययनात नवी माहिती आणि वाद समोर आणले आहेत. भूवैज्ञानिक सर्वेक्षणांनी लपलेल्या कक्षांचा शोध लावला आहे. या कक्षांमध्ये आणखी कलाकृती आणि संरचना असल्याचे मानले जाते. इंडोनेशियन सरकारने व्यापक संशोधनासाठी निधी उपलब्ध केला आहे. विविध डेटिंग प्रक्रियांनी वेगवेगळे निष्कर्ष दिल्याने वाद वाढत आहे.
या ठिकाणाची तुलना माचू पिचूसोबत केली जाते. दोन्ही स्थळं प्राचीन, रहस्यमय आणि पर्वतीय भागांमध्ये आहेत. गुनुंग पडांगने अनेक वंदतांना प्रेरित केले आहे. स्थानिक लोककथांमध्ये या स्थळाशी निगडित दिग्गज आणि प्राचीन राज्यांच्या कहाण्या सामील आहेत. हे एक लोकप्रिय पर्यटनस्थळ असून जगभरातील पर्यटक याच्या प्राचीन संरचना पाहण्यासाठी येतात.









