प्रतिनिधी / जळगाव :
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने मंगळवारी (दि. 27) जळगावला येत आहेत. या कार्यक्रमाला लाभार्थी उपस्थित न राहण्याची भिती मुख्यमंत्र्यांना वाटत आहे. त्यामुळे या कार्यक्रमास येण्यासाठी प्रशासनाकडून सक्ती केली जात आहे. लोकाभिमुख असाल तर लोकांनी आपणहून यायला हवे पण कार्यक्रमास येण्याची जबरदस्ती का करता, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला.
शासन आपल्या दारी कायक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंगळवारी (दि. 27) जळगावात येत असून या कार्यक्रमासाठी 35 हजार लाभार्थींना उपस्थित ठेवण्याचे नियोजन केले जात आहे. प्रत्येक तालुक्यात बसेस पाठवून लाभार्थी कसेही करून उपस्थित राहतील, याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर टाकली आहे. ही बाब लक्षात घेऊन एकनाथ खडसे यांनी राज्य शासनावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, वर्षभरात मुख्यमंत्री जळगावला तीन वेळा येऊन गेले. हा चौथा दौरा आहे. म्हणजे त्यांचे या या जिल्ह्यावर अधिक प्रेम आहे. सर्वात जास्त बंडखोरी या जिल्ह्यात झाली.
बंडखोरीचे कारण देताना आमच्या भागाचा, जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे, हे कारण दिले गेले. आता एक वर्ष झाले पण विकास कुठे असा सवाल करत जिल्ह्यातील कापूस उत्पादकांचा कापूस घरातच पडून आहे. व्यापारी तो घ्यायला तयार नाहीत. कापलाला 6000 रू प्रमाणे सानुग्रह अनुदान अथवा मदत दिली गेली पाहिजे. कांदा उत्पादक अडचणीत आहे. जिल्ह्यात पाणी पुरवठा मंत्री आहे. पण जिल्हाभर पाणी टंचाई असलेली शेकडो गावे आहेत. पाणीपुरवठा मंत्र्यांच्याच मतदारसंघात मन्यार खेडा, नशिराबाद, धरणगावला लोक पाण्यासाठी वणवण फिरत आहेत. सध्या जिल्ह्यात 27 टँकर सुरू असले तरी 150 ची मागणी आहे. सरकारकडून जाणीपूर्वक टँकर पुरवले जात नसल्याचा आरोपही खडसे यांनी केला.








