श्रीपाद नाईक यांच्यासह लोकांतही संताप : मुख्यमंत्र्यांनी चौकशी करण्याची गरज
पणजी : पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असलेल्या दोनापावला जेटीचे रितसर उद्घाटन झाले असले तरी या कार्यक्रमाला केंद्रीय पर्यटनमंत्री श्रीपाद नाईक यांना डावलल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. केंद्र सरकारच्या ‘स्वदेश दर्शन’ या योजनेतून विकसित करण्यात आलेल्या दोनापावला जेटीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात श्रीपाद नाईक यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत प्रसिद्ध न केल्याने हा घाव जिव्हारी लागल्याने मंत्री नाईक यांनी आपल्या भावना पत्रकारांसमोर व्यक्त केल्या. ते म्हणाले, दोनापावला जेटीच्या कार्यक्रमाला मला मुद्दामहून किंवा हेतुपुरस्सर डावलले गेले आहे का, याची आपल्याला कल्पना नाही. या जेटीच्या विकासासाठी आपण स्वत: केंद्रातून मदत येण्यासाठी प्रयत्न केले होते. केंद्र सरकारच्या अनेक प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी अनेकदा मला निमंत्रित केले जात नसल्याचे आढळून आले आहे. दोनापावला जेटीच्या उद्घाटन कार्यक्रमालाही आपल्याला निमंत्रण न दिल्याने याबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत व पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांना योग्य दखल घेण्यास सांगितल्याचे श्रीपाद नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
केंद्रीय प्रकल्प मिळवून देण्यात आणि स्थानिक खासदार म्हणून आपला वाटा मोठा आहे, तरीही असा प्रकार घडल्याने आपणही अचंबित झाल्याचे केंद्रीय मंत्री नाईक यांनी पत्रकारांना सांगितले. दोनापावला जेटीच्या लोकार्पण कार्यक्रमाला मुख्यमंत्री प्रमोद सावंत, महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, स्थानिक आमदार जेनिफर मोन्सेरात, महापौर रोहित मोन्सेरात, पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष आमदार गणेश गावकर हेही कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.









