मालवण :
ग्रामपंचायत देऊळवाडा याठिकाणी नवीन इमारत बांधकाम करण्यासाठी खरेदी केलेल्या जमिनीसाठी ग्रामनिधी फंडाचा गैरव्यवहार केल्याच्या तक्रारीची चौकशी होण्यासाठी सोमवारी ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाबाहेर वाजंत्री आंदोलन छेडले. ढोल–ताशांचा गजर करत ग्रामस्थांनी तीव्र शब्दात आपल्या भावाना प्रशासनासमोर मांडल्या. यावेळी प्रशासनानेही आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र, चर्चेनंतर ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्याकडून कोणताही वाद न वाढवत वादावर पडदा टाकण्यात आला.
दरम्यान, ग्रामस्थांना आवश्यक असणारी माहिती आठ दिवसात पुरविण्यात येईल, असे लेखी आश्वासन प्रशासनाच्यावतीने देण्यात आल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, पंचायत समितीसमोर अभिनय पद्धतीने झालेल्या आंदोलनाची चर्चा शहरात सुरू झाली होती. प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात काहीकाळ वाजंत्री वाजविल्यामुळे वाद निर्माण झाला होता. प्रशासनाकडून पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आल्याने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनीही वाजंत्री वाजविण्याची परवानगी नसल्याने कारवाई करण्यात येईल, असे सांगितल्यानंतर आंदोलनकर्ते अधिकच आक्रमक बनले होते.
- भर उन्हात झाली चर्चा
आंदोलनकर्ते आणि प्रशासन यांच्यात तब्बल एक तासभर उन्हात चर्चा रंगली होती. आंदोलनकतर्फे आपल्या मागणीवर ठाम होते. ग्रामपंचायत सक्षम नसतानाही त्यांनी जमीन खरेदीसाठी पैसे का वापरले? यासाठी वरिष्ठ पातळीवरून परवानगी घेण्यात आली होती का? असा सवाल उपस्थित केला. तर प्रशासनाकडून ग्रामपंचायतीला जमीन खरेदीचे अधिकार असल्याचे सांगण्यात आल्यानंतर अधिकच वाद वाढत गेला होता. दोन्ही बाजुने आक्रमक पवित्रा घेण्यात आल्यानंतर प्रशासनाकडून सविस्तर माहिती लेखी देण्याचे आश्वासन देण्यात आले. यामुळे आंदोलनकर्त्यांनी आंदोलन थांबविले.
- अशी आहे ग्रामस्थांची मागणी
जिल्हा सिंधुदुर्ग येथील ग्रामपंचायत देऊळवाडा या ग्रामपंचायतीच्या नवीन इमारत बांधकाम बाळासाहेब ठाकरे स्मृती ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत करण्याचे आहे. सदर इमारत बांधकामासाठी गाव मौजे देऊळवाडा, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग येथील स. नं. 133. हि. नं. 29 ही जमीन नोंदणीकृत खरेदीखताने खरेदी केलेली असून सदर खरेदीसाठी ग्रामनिधी फड़ाचा गैरवापर केलेला असून गैरव्यवहार केलेला आहे. ग्रामपंचायतीने केलेल्या ग्रामनिधी फंडाच्या गैरव्यवहाराबाबत कसून व सखोल चौकशी व्हावी. तसेच सदरच्या ग्रामपंचायत देऊळवाडा नवीन इमारत बांधकामास तात्काळ स्थगिती देणेत यावी. ग्रामपंचायत देऊळवाडा नवीन इमारत बांधकामास बाळासाहेब ठाकरे स्मृती ग्रामपंचायत बांधणी योजनेंतर्गत व इतर कोणताही अन्य फंडातून मंजूर झालेला निधी ग्रामपंचायत देऊळवाडा नवीन इमारत बांधणकामास खर्च घालू नये, अशी मागणी ग्रामस्थांनी करत आंदोलन छेडले होते. यामध्ये अमित तांबे, चंद्रकांत परब, विद्याधर सावंत, आयवन फर्नांडिस, फॅडी लोबो, दीपक तांबे, अनिल तांबे, दिलीप बागवे, चंद्रकांत सावंत, भावेश भोगले, सिद्धेश बागवे, दिगंबर बागवे यांचा समावेश आहे. ग्रामस्थांना सामाजिक कार्यकर्ते महेश जुवाटकर यांनी पाठिंबा देत आंदोलनातही सहभाग घेतला होता.
- आठ दिवसात सविस्तर माहिती देणार
अमित अशोक तांबे, रा. मसुरे (देऊळवाडा बौद्धवाडी) यांनी ग्रामपंचायत देऊळवाडा नवीन इमारत बांधकाम कामी खरेदी केलेल्या जमिनीसाठी ग्रामनिधी फंडाचा गैरव्यवहार केलेबाबत गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली आहे. ग्रामपंचायतीने ग्रामनिधीमधून ग्रामपंचायत कार्यालय इमारतीसाठी जमीन घेतली असुन ग्रामपंचायत मासिक सभा 28 डिसेंबर 2023 ठराव क्रमांक. 133/2 अन्वये ठराव पारित ग्रामपंचायतीने केलेला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम प्रमाणे ग्रामपंचायत व्यक्तीभूत संस्था असून तिला मालमत्ता धारण करण्यासाठी सक्षम असल्याने ग्रामपंचायतीने जमीन खरेदी केली आहे. आज ग्रामपंचायत जमीन खरेदीबाबत करीत असलेले ढोलताशा प्रदर्शन अंदोलन दरम्यान प्रशासक यांचे समोर झालेल्या चर्चेनुसार सद्यस्थिती निदर्शनास आणून देण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. तरी येत्या आठ दिवसात आपणांस रितसर कळवून सद्यस्थिती निदर्शनास आणून देण्यात येईल, असे लेखी आश्वासन पंचायत समिती प्रशासनाकडून ग्रामस्थांना देण्यात आले. यामुळे ग्रामस्थांनी आपले आंदोलन स्थगित केले होते.








