जालना येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे- पाटील उपोषणाला बसले आहेत. आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलीसांकडून लाठीहल्ला झाल्यानंतर राज्यात मराठा आंदोलन तीव्र होऊन राजकारण तापत आहे. उपोषणकर्त्यांच्या आंदोलनस्थळी जाऊन वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. आज एका मुलाखतीमध्ये महाविकास आघाडीवर टिका करताना त्यांनी तुम्ही सत्तेत असताना कोटा वाढवून देण्याचा फॉर्म्युला का वापरला नाही असा सवाल त्यांनी केला.
एका खाजगी वृत्तवाहीनीशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “गेले काही दिवसापासून तापलेल्या आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा नेते काय तोडगा काढत आहेत ते पाहत आहे. बहूतांश मराठा नेते सरंजाम मानसिकतेचे आहेत. मराठा समाजाची सत्ता केवळ निजामी मराठ्यांच्य़ा हाती सत्ता आहे. तरीही गरीब मराठा श्रीमंत मराठ्यालाच मतदान करतो. पण प्रस्थापीत मराठा नेत्यांकडूनच गरीब मराठ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे.”असे ते म्हणाले.
महाविकास आघाडीवर टिका करताना ते म्हणाले, “ओबीसी आरक्षणाचा कोटा वाढवून मराठा आरक्षण द्या असे सांगणाऱ्या महाविकास आघाडीने सत्तेत असताना हा फॉर्म्युला का वापरला नाही ? जरांगेच्या निमित्ताने वितुष्टवाद निर्माण केला जात आहे.”असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.








