माजी आमदार नरेश सावळ यांचा सवाल. डिचोलीच्या विकासासाठी सकारात्मक विचार. एकत्रित येऊन विकास होत असल्यास काहीच हरकत नाही.
डिचोली/प्रतिनिधी
डिचोलीचा विकास व्हावा हे एकच आमचे ध्येय असून त्यासाठी जर आमच्या गटातील नगरसेवक भाजपच्या मंडळात सामील झाले म्हणून निराश होण्याचे काहीच कारण नाही. उलट या गोष्टीला आपण सकारात्मक दृष्टीने पाहत आहे. विकासासाठी नगरसेवक या गटातून त्या गटात गेले म्हणून काहीच फरक पडत नाही. पण विकास व्हायला पाहिजे. या नवीन राजकीय समिकरणाला आपण सकारात्मक घेत असून “आय एम कंफर्टेबल इन धीस” अशी प्रतिक्रिया डिचोलीचे माजी आमदार तथा मगोचे नेते नरेश सावळ यांनी व्यक्त केली. तसेच राज्यात भाजप व मगोची सरकारात युती असतान स्थानिक पातळीवर भांडण का करावे ? असा सवाल सावळ यां?नी उपस्थित केला.
डिचोली नगरपालिकेत भाजपचे दहा, मगोचे तीन व आमदार डॉ. चंद्रकांत शेटय़? यांचा एक असे चौदा नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे निर्विवाद भाजपची सत्ता स्थापन झाली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेश पाटणेकर यांना काम न करता पक्षाविरोधात काम केल्याचा ठपका ठेवत सत्ताधारी भाजप गटातील सहा जणांचा एक गट स्थापन झाला होता. या गटाने मगो पक्षाच्या नगरसेविका सुखदा कमलाकर तेली व अँड. रंजना समीर वायंगणकर यांना बरोबर घेत आठ जणांचा गट स्थापन केला. या गटातील मगोच्या तेली व अँड. वायंगणकर यांचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील भाजप पालिका मंडळात स्वागत केले होते.
या गटातर्फे काल शुक्रवारी सकाळी उपनगराध्यक्षा म्हणून सुखदा तेली यांना विराजमान करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांनी माजी आमदार नरेश सावळ यांची भेट घेत या नवीन राजकीय समिकरणावर प्रश्न केला. राज्यातील सरकारात भाजप मगोची युती आहे. असे असताना येथे आम्ही एकमेकांमध्ये का भांडायचे ? उलट एकत्रित येऊन जर आपल्या भागाचा चांगला व शाश्वत विकास होत असल्यास तो करून घ्यावा. त्याकडे कोणतेही हेवेदावे राजकारण करू नये. असे आपणास वाटते.
या घटनेकडे आपण सकारात्मक असून या नवीन पालिका मंडळाने एकसंध राहून डिचोली नगरपालिका क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधावा. परंतु सदर विकास हा लोकांना ज्या पध्दतीने हवा आहे, ते पाहूनच साधावा. नगरपालिकेला पाहिजे म्हणून कोणताही प्रकल्प जबरदस्तीने न लादता त्याचा भविष्यात लोकांना कशा प्रकारे लाभ होणार याची दुरदृष्टी ठेऊन सर्वांना विश्वासात घेऊन प्रकल्प साकारावे. व विकास करावा. अशीच आपली अपेक्षा आहे.
सध्या डिचोली बसस्थानकाचे सुरू असलेले काम आणि त्याचा आराखडा बरोबर नाही. कारण सदर बसस्थानकाला पुढील काळाची व शहराची गरज ओळखून बेसमेंट पार्किंग व्यवस्था करणे आवश्यक आहे. बसस्थानक अगोदरच लहान आहे. त्यात बायपास रस्त्याचा सुमारे दहा मीटर भाग रूंद होणार असल्याने तो अधिकच लहान होणार आहे. त्यामुळे बसस्थानक बायपास रस्त्याच्या समांतर पातळीवर आणून त्याच्या खाली पार्किंग सोय करावी. त्यामुळे बसस्थानकाची जागा मोठी होऊ शकणार. असा आराखडा असणे आवश्यक आहे. असेही यावेळी माजी आमदार नरेश सावळ यांनी म्हटले. नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा सुखदा तेली यांचे सावळ यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी महेश्वर परब, कमलाकर तेली, नरेश कडकडे यांचीही उपस्थिती होती.









