कोणत्याही पार्टीत, किंवा आनंदप्रसंगी शँपेनची बाटली फोडण्याचा कार्यक्रम भारतातही अलिकडच्या काळात लोकप्रिय झालेला आहे. खरे तर, ही प्रथा आपण पाश्चिमात्य संस्कृतीतून उचलली आहे. आपल्या हिंदू संस्कृतीत कोणताही शुभ प्रसंग मद्याच्या संगतीत खरे तर साजरा केला जात नाही. पण जशी मद्य संस्कृती आपल्याकडे बोकाळली आहे, तशीच ही शँपेन संस्कृतीही येत आहे.
पण मुख्य प्रश्न असा की, मद्याचे अनेक प्रकार उपलब्ध असताना शँपेनची बाटली फोडूनच आनंदोत्सव का साजरा केला जातो ? इतर व्हिस्की, रम किंवा गेला बाजार बियरची बाटली का उपयोत आणली जात नाही ? याचे उत्तर बहुतेकांना माहीत नसते. कित्येकांना ते जाणून घेण्याची उत्सुकता असते. ही प्रथा प्रथम फ्रान्स देशात तेथील राज्यक्रांतीनंतर निर्माण झाली. या राज्यक्रांतीतून लोकशाहीचा पाया घातला गेला, असे म्हटले जाते. शँपेन हे फ्रान्सचेच जगप्रसिद्ध मद्य आहे. ते त्यावेळी अत्यंत महाग होते. आताही ते इतर मद्यांच्या तुलनेत महागच आहे. त्यामुळे असे महागडे मद्य जमीनीर सांडून आनंद सोहळा साजरा करणे, हे तेथे श्रीमंतीच्या प्रदर्शनाचा एक भाग मानले गेले. त्यातून ही प्रथा निर्माण झाली. आता भारतातही नवश्रीमंतांची संख्या वाढल्याने त्यांनी ही प्रथा हातोहात उचलली. त्यामुळे भारतातही शँपेनच्या बाटलीचे महत्व वाढले आहे.









