पेडणेतील नऊ पंचायतींचा मुख्यमंत्र्यांना सवाल : मांद्रेचे आमदार आरोलकरही भेटले मुख्यमंत्र्यांना
पणजी : पेडणे तालुक्यात नगरनियोजन खात्याने झोनिंग प्लॅन करण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याला तालुक्यातील नऊ पंचायतींनी विरोध केला आहे. पूर्वीपासूनच पेडण्याची प्रादेशिक योजना अस्तित्वात असताना पुन्हा एकदा पेडण्याचा आराखडा बदलाची योजना कशासाठी राबवली जात आहे. ही योजना पूर्णपणे रद्दबातल करावी, अशी मागणी पंचायतीचे सरपंच, पंच सदस्य व आमदार जीत आरोलकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे केली. काल शुक्रवारी आमदार जीत आरोलकर यांच्या नेतृत्वाखाली पेडणे तालुक्यातील नऊ पंचायतीचे सरपंच, जिल्हा पंचायत सदस्य व पंचसदस्यांनी मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले. आमदार आरोलकर यांच्यासमवेत मोरजीचे जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर, मांद्रेचे सरपंच अमित सावंत, मांद्रेचे पंच बाळा नाईक, पार्सेचे सरपंच अजय कळंगुटकर, पंच स्वप्नील नाईक, मोरजीचे सरपंच मुकेश गडेकर, आगरवाडा-चोपडेचे सरपंच अॅन्टोनी फर्नांडिस व प्रभाग 7 चे पंच सदस्य हेमंत दिगंबर चोपडेकर, पंच सचिन राऊत तसेच इतर पंचायतीचे सरपंच व पंचसदस्य उपस्थित होते.
नगरनियोजन खात्याने कोणतीच तसदी न घेता जनतेचा विरोध डावलून प्रस्तावित कामाला सुरवात केल्याचे आमदार जीत आरोलकर यांनी मुख्यमंत्री सावंत यांच्या निदर्शनास आणून दिले. पेडण्यात जमीन खरेदी करणाऱ्या मोठ्या गुंतवणुकदारांच्या फायद्यासाठी नगरनियोजन खात्याच्या निबंधकांनी ही योजना तयार केली आहे, असा आरोप आरोलकर यांनी केला. लोकांचा विकासाला विरोध नाही. परंतु प्रस्तावित झोनिंग प्लॅनमुळे प्रत्येक पंचायत क्षेत्रातील स्मशानभूमी, पारंपरिक मच्छीमारांसाठी जमीन, धार्मिक क्षेत्र आणि इतर उपयोगी हेतूंच्या सुरक्षेबाबतचा विचारच केला नसल्याची माहिती पेडण्यातील बहुतांश सरपंचांनी मुख्यमंत्री सावंत यांना दिली. नगरनियोजन खात्याचे मंत्री विश्वजित राणे हे जनतेचा विरोध डावलून मनमानी करून पेडण्याचे नुकसान करीत आहेत. मुख्यमंत्री सावंत यांनी यात स्वत: लक्ष घालून हा प्रस्तावित आराखडा रद्द करावा, अशी मागणी केली.
या आराखड्यात स्मशानभूमी गायब
या झोनिंग प्लानमध्ये एससी समाजबांधवांसाठी असलेली स्मशानभूमी गायब झाली आहे. यापूर्वीच इडन इनव्हेस्टमेंट कंपनीने येथील जमीन विकत घेतलेली आहे. चोपडे जंगलव्याप्त साडेसहा लाख स्क्वे. मी. जमिनीचे सेटलमेंट झोनमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. आता नव्याने झोनिंग प्लान होत असेल तर पूर्णपणे गावावरच गदा येणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनाही या ठिकाणच्या स्मशानभूमीबाबत निवेदनाद्वारे विचारणा केली होती, अशी माहिती आगरवाडा चोपडेचे पंच हेमंत चोपडेकर यांनी मुख्यमंत्री सावंत यांना दिली.
सोमवारपर्यंत वेळ द्या; तोडगा काढू : मुख्यमंत्री
जर लोकांना कोणत्याच प्रकारची माहिती न देता आणि विश्वासात न घेता या प्रस्तावित झोनिंग प्लानचे काम होत असेल तर आपण त्यावर येत्या सोमवारपर्यंत तोडगा काढू. पेडण्यातील शेती नष्ट करून आपण कोणत्याच प्रकारच्या विकासाला पाठिंबा देणार नसल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी पेडणेवासीयांना आश्वासन दिले.









