ऑनलाईन टीम / तरुण भारत :
5 जून हा दिवस जगभरात पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षीही पर्यावरण जागृती करण्यासाठी भारतासह अनेक देशांमध्ये हा दिवस साजरा होत आहे.
का साजरा केला जातो पर्यावरण दिन?
मानवाने नैसर्गिक संसाधनांचा अमर्यादित, अनियंत्रित आणि अशाश्वत पद्धतीने वापर सुरू केला. संसाधनांची मुक्त हस्ते लूट सुरू झाली. परिणामी, निसर्गाचा, वनसंपदेचा, जैवविविधतेचा आणि एकूणच पर्यावरणाचा झपाट्याने र्हास होण्यास सुरुवात झाली होती. कालांतराने या ऱ्हासाचे आणि प्रदूषणाचे परिणाम जाणवायला लागले. पर्यावरणामुळेच मनुष्य, प्राणी-पक्षी, किटक यांचं जीवन शक्य आहे. त्यामुळे मानवाची निसर्गाशी तुटलेली नाळ पुन्हा जोडण्यासाठी काय करता येईल, यावर शास्त्रज्ञांकडून विचारविनिमय सुरू होता. पर्यावरणाशी संबंधित समस्यांना मानवी चेहरा देण्यासोबतच, लोकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी पर्यावरण दिन जगभरात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पर्यावरण दिनाची संकल्पना कुठून आली?
1972 मध्ये स्टॉकहोम येथे संयुक्त राष्ट्रांची मानवी पर्यावरण परिषद झाली. या परिषदेत 119 देश सहभागी होते. 5 जून ते 16 जूनपर्यंत चाललेल्या या परिषदेत जागतिक पर्यावरण दिनाचा उगम झाला. तेव्हापासून जागतिक पर्यावरण दिन हा 5 जून रोजी साजरा करण्यात येत आहे. सर्वप्रथम स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर इतर देशात पर्यावरण दिन साजरा होऊ लागला. दरवर्षी जागतिक पर्यावरण दिनाची वेगवेगळी थीम जाहीर करण्यात येते. त्यानुसार यावर्षीची थीम ‘Only One Earth’ अशी आहे. या थीमवर आधारित ‘leaving in hormony with nature’ वर लक्ष केंद्रित केले जात आहे.
पर्यावरणाची चिंता असलेले आणि त्याची काळजी घेणारे अनेक पर्यावरणवादी घटक, संघटना, पर्यावरण प्रेमींकडून हा दिवस साजरा केला जातो. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी या दिवशी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.