कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांचा सवाल
पणजी : अटल सेतू तसेच सरकारच्या आणखी काही खात्यात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे प्रसिद्ध झालेली असताना केवळ कला अकादमीवरच एवढा गाजावजा कशाला? इतर ठिकाणच्या भ्रष्टाचाराची दखल का घेत नाही? असा सवाल करून कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी केवळ आपल्यालाच टार्गेट केले जातेय, अशी टीका केल्याने राजकीय वर्तुळात बरीच खळबळ माजली आहे. काँग्रेसने त्यांच्या निवेदनावर उपरोधिकपणे टिप्पणी करताना गोविंद गावडे यांचे स्वागत केले आहे. आपल्याच सरकारचा भ्रष्टाचार उघड केल्याबद्दल त्यांचे आभारही मानले आहेत.
विधानसभा अधिवेशनाच्या दरम्यान सभागृहात प्रवेश करण्यापूर्वी काही सोशल मीडियाच्या पॅमेरामननी त्यांना अडवून कला अकादमी प्रकरणी काही सवाल विचारले असता ते म्हणाले की अटल सेतू प्रकरणात बरेच काही झाले, भ्रष्टाचार झाला. परंतु त्याला कोणी कधी घोटाळा किंवा ‘स्पॅम’ म्हटले नाही. मध्यंतरी काही वृत्तपत्रांत एका खात्यात ऊ. 120 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची मोठी बातमी प्रकाशित झाली. परंतु त्यावेळी कोणाला हा महाघोटाळा वाटला नाही. कला अकादमीच्या बाबतीत मात्र हा घोटाळा वाटला. हे दुसरे तिसरे काही नसून केवळ आपल्याला टार्गेट केले जातेय, असे मंत्री गोविंद गावडे म्हणाले. त्यांच्या या निवेदनाने भाजप सरकारने भ्रष्टाचार व घोटाळे केल्याचे त्यांनी मान्य केल्यासारखे झाले आहे. परिणामी सत्ताधारी भाजप कार्यकर्त्यांमध्येच गोंधळ उडाला व त्यांनी प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांच्याकडे तक्रारी केल्या. तानावडे यांनी हे प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातले आहे.
काँग्रेसकडून गावडे यांचे स्वागत
अटल सेतू आणि अन्य प्रकल्पात भ्रष्टाचार झाला असताना केवळ गावडे यांनाच का लक्ष्य केले जात आहे, या गावडे यांच्या विधानाचा संदर्भ देत काँग्रेसचे मीडिया प्रमुख अमरनाथ पणजीकर म्हणाले की, लोकांनी गावडे यांच्या धाडसाचे कौतुक केले पाहिजे. आपल्या सरकारमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे पाहून अनेकजण मौन बाळगतात. पण गोविंद गावडे यांनी एक आदर्श घालून दिला आहे की सत्ताधारी आमदार स्वत:चे सरकार कसे भ्रष्टाचार करते हे उघडकीस आणू शकतात आणि लोकशाहीला पारदर्शकपणे पुढे नेण्यास मदत करू शकतात. गावडे यांनी भाजपची जनविरोधी कृत्ये आणि भ्रष्टाचार अशाच प्रकारे उघड करावा, अशी विनंती आपण त्यांना करत आहे, असे पणजीकर म्हणाले. पणजीकर पुढे म्हणाले की, गोविंद गावडे अटल सेतू घोटाळ्याबाबत सत्य बोलले आहेत. अटल सेतू हे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचे स्मारक बनले होते. माजी गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पुराव्यानिशी हा घोटाळा उघडकीस आणला होता.









