रमेश नाईक यांचा सहकार खात्याला सवाल : गोवा डेअरीतील गैरव्यवहार, आज सुनावणी
प्रतिनिधी /पणजी
गोवा डेअरीमधील गैरव्यवहारप्रकरणी सहकार खात्याने ज्या संचालकांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या होत्या त्या संचालकांनी गेल्या दोन वर्षात अद्याप उत्तर दिलेले नाही. अशा संचालकांविरुद्ध खाते कारवाई का करीत नाही? त्यांना नियमानुसार अपात्र का ठरविले जात नाही? असा सवाल एका संस्थेचे चेअरमन रमेश नाईक यांनी सहकार निबंधकांना केल्याने संचालक पुन्हा अडचणीत आले आहेत. सहकार निबंधकांनी आज सोमवारी या विषयावर सुनावणी ठेवल्याचे वृत्त आहे.
प्राप्त माहितीनुसार, कुडतरी सहकारी दुग्धविकास सोसायटीचे चेअरमन रमेश नाईक यांनी 2019 मध्ये सहकार खात्याला एका पत्राद्वारे गोवा डेअरीच्या संचालक आणि व्यवस्थापकीय संचालकांनी मिळून रु. 6.33 कोटींचा गैरव्यवहार केल्याची लेखी तक्रार मांडली होती. मुख्य़मंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्याची गंभीर दखल घेऊन सहकार निबंधकांना चौकशीचा आदेश दिला. सहकार निबंधकांनी राजेश परवार यांना या प्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले होते.
गैरव्यवहाय झाल्याचे सिद्ध
साहाय्यक निबंधक राजेश परवार यांनी चौकशी पूर्ण केली आणि त्यात गैरव्यवहार झाल्याचे मान्य करुन कारवाई करण्याची शिफारस केली. त्यानंतर सहकार निबंधकांनी व्यवस्थापकीय संचालकांसह गोवा डेअरीच्या सर्व संचालकांना कारणे दाखवा नोटीसा बजावून त्यांना त्वरित उत्तर देण्यास सांगितले होते. रमेश नाईक यांनी दि. 22 ऑगस्ट 2022 रोजी पुन्हा एकदा सहकार निबंधकांना पत्र पाठवून या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत.
सध्याच्या संचालकांना गेल्या होत्या नोटिसा
सध्याच्या गोवा डेअरीच्या संचालक मंडळावर निवडून आलेले संचालक यांना नोटीस गेल्या होत्या. कायद्यानुसार कारणे दाखवा नोटीसा बजावल्यानंतर 15 दिवसांमध्ये त्यांनी उत्तर देणे आवश्यक होते. त्यांना नोटीसा बजावल्यास आता 2 वर्षे लोटली, पण कारवाई झालेली नाही.
अन्यथा उच्च न्यायालयात जाणार : रमेश नाईक
सहकार खाते अद्याप या प्रकरणी कारवाई का नाही करीत? आपल्याला त्वरित उत्तर द्या. अन्यथा आपल्याला उच्च न्यायालयात जावे लागेल असा इशारा रमेश नाईक यांनी दिला आहे. अशा व्यक्तीला एकतर अपात्र तरी ठरविणे आवश्यक होते असेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, रमेश नाईक यांनी दिलेल्या या पत्रामुळे निद्रिस्थ सहकार खाते खडबडून जागे झाले आहे. सहकार निबंधकांनी आज सोमवार दि. 29 ऑगस्ट रोजी या विषयावर सुनावणी ठेवली आहे. विद्यमान संचालकांना काही राजकीय नेत्यांचा पाठिंबा असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई शक्य होणार नाही. सहकार निबंधकांनी देखील हे प्रकरण गांभिर्याने घेतलेले नाही. रमेश नाईक यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा देताच नाईलाजाने सहकार खात्याला किमान हा विषय सुनावणीस घेणे क्रमप्राप्त ठरले आहे.
कोण आहेत हे संचालक?
विद्यमान गोवा डेअरीवर निवडून आलेले संचालक ज्यांना कारणे दाखवा नोटीसा यापूर्वी बजावलेल्या आहेत त्यात विद्यमान चेअरमन राजेश फळदेसाई, विठोबा देसाई, उल्हास सिनारी, गुरुदास परब, बाबुराव फट्टो देसाई, विजयाकांत गावकर, श्रीकांत नाईक आणि माधव सहकारी यांचा समावेश आहे.









