पुणे / प्रतिनिधी :
आर्थिक गैरव्यवहाराच्या नावाखाली विरोधी पक्षातील नेत्यांना तुरुंगात डांबण्यात येत असून, दहा ते वीस लाखांच्या व्यवहाराकरिता त्यांच्या कुटुंबियांची चौकशी केली जात आहे. मात्र, दादा भुसे, राहुल कुल यांच्याशी संबंधित कारखान्यांच्या गैरव्यवहाराची प्रकरणे पुढे आणूनही त्यांच्यावर कारवाई का होत नाही, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून बुधवारी पत्रकार परिषदेत केला.
पुण्यात आले असता ते बोलत होते. राऊत म्हणाले, दादा भुसे यांनी मालेगावातील गिरणा कारखाना बचावच्या नावाखाली 100 कोटी रुपये जमा केले. त्या पैशांचे काय झाले, हा आमचा प्रश्न आहे. कारखाना कुठेही दिसत नाही, मग पैसे गेले कुठे? याप्रकरणी चौकशीची मागणी केली, तर म्हणतात की आम्ही नशेत आहोत. मग तुम्ही आमच्या लोकांवर कारवाई करता, तेव्हा तुम्ही कोणत्या नशेत असता? मी दौंडच्या कारखान्याचा ऑडीट रिपोर्टही फडणवीस यांना पाठविला आहे. त्याच्या चौकशीही मागणी आम्ही केली होती. याबाबत बोलण्यासाठी मी फडणवीसांकडे भेटीची वेळही मागितली आहे. पण त्यांच्याकडे मला भेटायला वेळ नाही. त्यामुळे हे सरकार नेमके कोणत्या नशेत काम करते, हे कळत नाही.
आर्थिक गैरव्यवहाराविषयी दौंडधील शेतकरी कृती समितीने एका सभेचे आयोजन केले असून, शेतकऱयांच्या या लढाईत मी सहभागी होत आहे. सरकार भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि दादा भुसेंवर गुन्हा दाखल करणार नसेल, तर विरोधकांवर कारवाई करण्याचा कोणताही नैतिक अधिकार त्यांना उरत नाही. सरकार लफंग्यांना पाठिशी घालतेय, असाच त्याचा अर्थ असून, हे फडणवीसांनी मान्य करायला हवे, असा टोलाही त्यांनी लगावला.








