जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातून विरोध केल्याने मनपा कर्मचारी फिरले माघारी
बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील अतिक्रमण हटविण्यासाठी मनपाचे कर्मचारी दाखल झाले होते. मात्र त्याला काही जणांनी विरोध केला. त्यामुळे ती अतिक्रमण मोहीम थंडावली आहे. शहरातील गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार परिसरात अनेकांनी रस्त्यांवर अतिक्रमण केले आहे. ते हटवावे, अशी मागणी करण्यात येत आहे. ज्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अडचण नाही त्या ठिकाणचे अतिक्रमण हटविण्यापेक्षा वाहतुकीची कोंडी होत आहे त्या ठिकाणचे प्रथम अतिक्रमण हटवावे, अशी मागणी होताना दिसत आहे. शहरामध्ये अनेक ठिकाणी बिनधास्तपणे रस्त्यावरच व्यवसाय थाटण्यात आला आहे. बऱ्याचवेळा वाहनेदेखील त्या ठिकाणांहून पुढे जाणे अवघड जाते. गणपत गल्लीमध्ये भर रस्त्यावर अनेकांनी अतिक्रमण केले आहे. फेरीवाले रस्त्याच्या मधोमधच थांबत आहेत. त्यामुळे ये-जा करणे अवघड झाले आहे.
सणासुधीच्या काळात तर पादचाऱ्यांनाही तेथून ये-जा करणे अवघड जात आहे. त्याकडे मनपाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे आणि इतरत्र हलवावे, अशी मागणी होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात सध्या विकासकामे राबविण्यात आली आहेत. त्या ठिकाणी काही चहाच्या टपरी सुरू केल्या आहेत. याचबरोबर एक रिक्षाच्या माध्यमातूनदेखील चहा विक्री महिला करत होत्या. त्यानंतर तातडीने त्या ठिकाणी मनपाचे कर्मचारी दाखल झाले आणि ती रिक्षा हटविण्याचा प्रयत्न केला. मात्र काही जणांनी त्याला विरोध केल्याने तेथून मनपाच्या कर्मचाऱ्यांनी काढता पाय घेतला.









