ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटातील सलोख्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नेत्या दीपाली सय्यद (Deepali sayed) यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थित त्यांचा शिंदे गटात प्रवेश होणार होता. मात्र, त्यांचा पक्षप्रवेश आज तिसऱ्यांदा वेटिंगवर ठेवण्यात आला. त्यामुळे सय्यद यांच्या पक्षप्रवेशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आनंद आश्रम येथे आज सय्यद शिंदे गटात प्रवेश करणार होत्या. मात्र, अचानक त्यांना तुमचा पक्षप्रवेश आज होणार नाही, असं कळविण्यात आलं. भाजपने त्यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध केला आहे. सय्यद यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे शिंदे गटातील प्रवेशाला भाजपचा तीव्र विरोध आहे. सय्यद यांना शिंदे गटाने पक्ष प्रवेश दिल्यास भाजप-शिंदे गटातील संबंध बिघडू शकतात. या भीतीने शिंदे गटातील प्रवेश लांबवला जात असल्याचे सांगण्यात येते.
अधिक वाचा : धुळ्यात मुन्नाभाई डॉक्टरांचा सुळसुळाट
भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या मृणाल पेंडसे यांनी हा विरोध केला आहे. सय्यद यांनी मोदी आणि भाजपची जाहीर माफी मागितली तरच त्यांना पक्षप्रवेश द्यावा, असे पेंडसे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांची गोची झाली असून, सय्यद यांना प्रवेश द्यायचा की नाही, याबाबत चर्चा सुरू आहे.








