भाजप नेते अमित शाह यांची टीका : भगवंत मान हे मुख्यमंत्री का पायलट
वृत्तसंस्था/ गुरदासपूर
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर निशाणा साधला आहे. केंद्रातील मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त गृहमंत्री शाह यांनी पंजाबच्या गुरदासपूर येथे एका जाहीर सभेला संबोधित केले आहे. भगवंत मान यांच्याकडे अरविंद केजरीवाल यांच्यासाठी भरपूर वेळ आहे, परंतु पंजाबच्या लोकांसाठी वेळ नाही. भगवंत मान यांचे केजरीवालांना देशाटन घडवून आणणे हेच एकमेव काम आहे. भगवंत मान हे मुख्यमंत्री आहेत का पायलट हेच कधीकधी समजत नसल्याचे म्हणत शाह यांनी त्यांच्यावर शरसंधान केले आहे.
पंजाबमधील लोक स्वत:ला असुरक्षित समजू लागले आहेत. भगवंत मान यांचा पूर्ण वेळ दौऱ्यांमध्ये जात असल्याने पंजाबची कायदा-सुव्यवस्था बिघडू लागली आहे. येथील लोक सुरक्षित असून अमली पदार्थांचा वापर वाढत आहे. शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये भर पडत असताना मुख्यमंत्री मान यांच्याकडे वेळच नाही. आम आदमी पक्षासारख्या पोकळ घोषणा करणारा अन्य कुठलाच पक्ष नसल्याची टीका शाह यांनी केली आहे.
आम आदमी पक्ष प्रत्येक महिलेला 1 हजार रुपये दर महिन्याला देणार होता. या आश्वासनाचे काय झाले? राज्यातील महिलांना एक हजार रुपये सोडाच एक रुपया देखील अद्याप मिळालेला नाही. पंजाब सरकारने पंजाबमध्ये जाहिराती प्रकाशित केल्यास समजू शकते, परंतु पंजाबच्या जाहिराती केरळ, बंगाल अन् गुजरातमध्ये प्रकाशित होत आहेत, यामुळे पंजाबची तिजोरी रिकामी होत असल्याचा आरोप शाह यांनी केला आहे.
पंजाबमधील अमली पदार्थांचा अवैध व्यापार समूळ नष्ट करण्यासाठी मोदी सरकार काम करत आहे. अमली पदार्थांच्या विरोधात लढण्यासाठी अमृतसर येथे एक महिन्याच्या आत एनसीबीचे कार्यालय सुरू होणार आहे. काही कालावधीतच भाजपचे कार्यकर्ते प्रत्येक गावात जाऊन अमली पदार्थांच्या विरोधात जनजागृती यात्रा सुरू करणार असल्याचे शाह यांनी सांगितले आहे.









