विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचा सवाल
मडगाव : भाजप सरकारची तिजोरी पूर्णपणे रिकामी असताना गोवा मनोरंजन संस्थेने 250 एकर जमीन असलेल्या खासगी जमीन मालकांकडून गोव्यात चित्रपट नगरी उभारण्यासाठी प्रस्ताव मागवणारी जाहिरात प्रसिद्ध करणे हे कल्पनेच्या पलीकडचे आहे. सरकारी जागा असताना खासगी जागेत फिल्म सिटी कशाला? मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा मनोरंजन संस्थेला यापूर्वी भुतखांब-केरी येथे एसईझेड, नायलॉन-66ला दिलेली जमीन किंवा नाकेरी-बेतूल येथील सरकारकडे उपलब्ध असलेल्या जमिनीचा वापर फिल्म सिटी उभारण्यासाठी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे. डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा भाजप पॅडरमधील रिएल इस्टेट व्यवसायात असलेल्या एखाद्यावर मेहरबानी करण्याचा हा डाव असून सरकारकडे जमिनीची उपलब्धता असूनही खाजगी जमीन मालकांकडून गोवा मनोरंजन संस्थेने बोली मागविणे यामागे काळेबेरे असल्याची शंका आलेमाव यांनी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मागील पाच आवृत्यामध्ये सहभागी झालेल्या देशी व विदेशी प्रतिनिधींची आकडेवारी उघड करण्याचे धाडस दाखवावे. प्रस्तावीत ‘कन्व्हेन्शन सेंटरची’ सद्यस्थिती काय आहे हे गोमतकीयांना सांगावे. दरवषी सुमारे 20 ते 25 कोटी खर्च करीत असलेल्या इफ्फीचा गोवा आणि गोव्यातील चित्रपट निर्मात्यांना नेमका फायदा काय झाला आहे, हे सरकारने स्पष्ट करणे गरजेचे आहे, असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.









