मडगावचे नगराध्यक्ष घनश्याम शिरोडकर यांचा भाजपच्या हालचालींच्या अनुषंगाने सवाल
प्रतिनिधी/ मडगाव
आपणावर अविश्वास ठराव कोणत्या कारणास्तव आणला जात आहे याबाबत स्पष्टता असणे गरजेचे आहे. मला सहा महिने-वर्षभर कामे करू दिले गेले व त्यात मी अकार्यक्षम ठरल्याने अविश्वास ठराव आणला गेला, तर मी समजू शकतो. मात्र कोणतेही कारण नसताना अविश्वास ठराव का, असा सवाल मडगाव पालिकेचे नवीन नगराध्यक्ष घनश्याम शिरोडकर यांनी उपस्थित केला आहे.
भाजपाने त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी हालचाली सुरू केल्याचे त्यांच्या नजरेस आणून दिले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. मलाही यासंदर्भात माहिती मिळाली आहे. मात्र एक स्वतंत्र नगरसेवक म्हणून निवडणूक लढवून लोकशाही पद्धतीने मी जिंकून आलेलो आहे. 15 नगरसेवकांनी माझ्यावर विश्वास दाखविला. सर्व स्तरांतून व मडगावातील विविध घटकांकडून माझे अभिनंदन करण्यात आले आहे आणि मडगाव पालिका क्षेत्राचा चांगल्या प्रकारे विकास घडवून आणावा असे आवाहन मला करण्यात आलेले आहे, असे शिरोडकर यांनी सांगितले.
पालिका निवडणुकीत पक्षाचे राजकारण येऊ नये. ही एक स्वायत्त संस्था आहे. येथे सर्व नगरसेवकांनी मिळून एकत्रितपणे नियोजन करून विकास साधणे आवश्यक आहे. यासाठी सत्ताधारी तसेच विरोधकांकडून सहकार्याची गरज असते. मी स्वतंत्र उमेदवार म्हणून उमेदवारी दाखल केल्यानंतर पक्षाकडील संलग्नता बाजूला ठेवून नगरसेवकांनी मला मतदान केले आहे, याकडे नगराध्यक्ष शिरोडकर यांनी लक्ष वेधले.
फक्त विकासकामांचे ध्येय
मला नगरसेवकांकडून सहय़ा घेण्यात आल्याचे तसेच नारळावर हात ठेवायला लावून प्रमाण घेतल्याचे समजले आहे. मात्र अशा प्रकारे नारळ हातात घेण्याचे वा देण्याचे राजकारण मी कधी केले नसून श्री दामबाबाच्या कृपेने माझ्याकडे सर्व काही आहे. त्यामुळे मला कसलाही लोभ नाही. मडगाव व फातोर्डावासियांचे भले व्हावे आणि त्यादृष्टीने नगराध्यक्षपद मिळवून आवश्यक विकासकामे करणे इतकेच माझे ध्येय आहे, असे शिरोडकर यांनी सांगितले.
मडगाव नगराध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत आमदार दिगंबर कामत आणि भाजपाचे उमेदवार दामोदर शिरोडकर यांचा स्वतंत्र उमेदवार घनश्याम शिरोडकर यांनी 15 विरूद्ध 10 मतांनी पराभव केल्याने कामत आणि भाजपाला धक्का बसला होता. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या निवडणुकीत लक्ष घातले होते. तरीही हा धक्कादायक निकाल आला होता. गोवा फॉरवर्डचे 8 नगरसेवक तसेच भाजप गटातील नगरसेविका सुनीता पराडकर उघडपणे घनश्याम शिरोडकर यांच्यामागे राहिल्याने त्यांच्याकडे 10 नगरसेवकांचे पाठबळ होते व जादुई 13 च्या आकडय़ासाठी त्यांना आणखी तीन नगरसेवकांची गरज होती. मात्र त्यांना अतिरिक्त चक्क 5 मते पडली होती. त्यामुळे भाजपाची आणखी 5 मते फुटल्याचे स्पष्ट झाले होते.
त्यानंतर ही मते कुणाची फुटली याची खातरजमा करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळीच भाजप गटातील नगरसेवकांना पणजीत बोलावून घेण्यात आले होते. तेथे अविश्वास ठराव आणण्याच्या दृष्टीने तयारी सुरू करताना नगरसेवकांच्या सहय़ा घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. तसेच या नगरसेवकांना नंतर जांबावलीतील श्री दामोदर संस्थानात नेऊन तेथे नारळावर हात ठेवून प्रमाण द्यायला लावले होते.









