अध्याय एकतिसावा
शुकमुनी श्रीकृष्ण महात्म्य राजाला सांगत आहेत. ते म्हणाले, श्रीकृष्णवचन अतिअगाध आहे. एकदा त्यांनी शब्द दिला की ते तो कधीही फिरवत नसत. दिलेला शब्द पाळून त्यांनी अनेकांना तारले आहे. जराव्याधाने त्यांना बाण मारून अक्षम्य अपराध केला होता तरी दिल्या वचनाप्रमाणे त्याला त्यांनी स्वर्गात धाडून दिले. अशा सामर्थ्यवान असलेल्या श्रीकृष्णाला स्वत:चा देह राखणे अशक्य होते काय? परंतु त्यांना देहबुद्धीच नसल्याने त्यांनी देहाचा सहजी त्याग केला आणि ते निजधामाला निघून गेले.
खरं म्हणजे ते अत्यंत सामर्थ्यशाली असल्याने ह्या लोकातील कुणी त्यांना हात लावायची हिम्मतही करू शकत नसल्याने त्यांना कुणाचे भय होते असेही नाही. थोडक्यात सर्व काही त्यांच्या इच्छेनुसार ते करू शकत होते. त्यांचे सामर्थ्यही अद्भुत होते. देही असून विदेह स्थिती ते अनुभवत होते. हे सगळे लक्षात घेतले तर ह्या अवतारातले कार्य संपल्यामुळे ते स्वेच्छेने निजधामाला गेले असेच म्हणता येईल. ह्या लोकीची आसक्ती त्यांना बिलकुल नव्हती तसेच निजधामाची अतिप्रीती होती अशातलाही भाग नाही. मग ते इथे राहिले असते तर काय बिघडले असते, असाही एक विचार कुणाच्याही मनात आला तर नवल नाही. त्यामुळे त्यांचे सगुण रूपातील दर्शन तरी होत राहिले असते असेही सगळ्यांना वाटेल. त्यांच्या रूपाचे दर्शन किती नयनमनोहर होते ते मी तुला आधी सांगितलेच आहे. असं जरी असलं तरी श्रीकृष्णनाथांनी सदेह वैकुंठगमन केले ही गोष्ट खरी.
ह्यामागचे एक कारण असेही सांगता येईल की, श्रीकृष्णनाथांच्या नयनमनोहर दर्शनाचे सामान्य लोकांच्याप्रमाणे साधकांनाही अत्यंत आकर्षण होते. त्यांच्या रूपाचे ध्यान लागले की, विषयसेवन बाधत नाही हे लक्षात आल्याने त्यांचे लक्ष सदोदित त्यांच्या देहाच्या ध्यानाकडेच लागलेले असे.
साधनेच्या सुरवातीच्या टप्प्यात हे ठीक असले तरी साधकाची पुढील प्रगती होण्यासाठी ध्येयमूर्तीची आवश्यकता नसते. श्रीकृष्ण जर येथेच राहिले असते तर साधक त्यांच्या सगुणरुपाच्या ध्यानात अडकून पडला असता आणि त्यांचा योगाभ्यास तेथेच खुंटला असता. श्रीकृष्णांचे ध्यान केल्याने विषयसेवन बाधत नाही हे लक्षात आल्यावर प्राणापान समान करून, त्यांचे ध्यान करून जर ते निर्धास्तपणे विषयसेवन करू लागले तर त्यांचा अभिमान वाढला असता. साधकांचा जर देहाभिमान वाढला तर त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले नसते.
ही बाब लक्षात घेऊन विदेही असलेल्या श्रीकृष्णनाथांनी निजधामी गमन केले. आत्मज्ञान न झाल्याने श्रीकृष्णनाथ देही असून विदेहीपणे कसे रहात होते हे साधकांना न समजल्याने ते त्यांच्याप्रमाणे विषयसेवन करण्यातच धन्यता मानतील हा धोका ओळखून ते निजधामाला निघून गेले. ते निजधामाला जाण्याचे आणखी एक उद्दिष्ट म्हणजे, त्यांच्या देहाची स्थिती, गती महादेवांनाही उलगडली नव्हती. शक्तिशाली अशा महादेवांची ही अवस्थाहोती.
साहजिकच ती इतरांना कळण्याच्या पलीकडली असल्याने ते विषयसेवन करण्यातच गुंग होतील हाही धोका होताच. आणखी विशेष म्हणजे त्यांचे सदेह दर्शन घेतल्या घेतल्या सर्व भक्तांचे, साधकांचे मन निवत असे. असे जरी असले तरी त्यांचा देहही मिथ्या म्हणजे समोर दिसत असला तरी कधी ना कधी नाश पावणारा आहे हे लोकांच्या लक्षात यावे ह्या उद्देशाने श्रीकृष्णनाथांनी निजधाम जवळ केले असेही म्हणता येईल.
थोडक्यात देहाभिमान नष्ट करण्यासाठी श्रीकृष्णांनी निजधामाला गमन केले हे स्पष्ट आहे. तसे करून त्यांनी कृपाळूपणे साधक जनांना तारले आणि त्यांच्या उद्धाराची व्यवस्था केली. अशाप्रकारे दृढ वैराग्य धारण करून देहाभिमानाच्या तावडीतून सुटका करून घ्यावी आणि निजात्मस्थिती प्राप्त करून घ्यावी ही दीक्षा सर्व साधकांना देऊन श्रीपती निघून गेले.
क्रमश:









