सांगली / विनायक जाधव :
भौतिक सोयीसुविधांनी जीवन सुसह्य झाले आहे, क्षणात लोक सोशल मिडियाच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्कात येतात. इतके सहज जीवन झाले असतानाही लोक आत्महत्या का करत आहेत. याचा विचार आता पुन्हा करण्याची गरज निर्माण झाली आहे. मनुष्य जन्म हा नशीबाने मिळतो असे म्हंटले जाते. पण हा नशिबाने मिळालेला मनुष्य जन्म मात्र अनेकजण आपल्या स्वत: च्या हाताने स्वतःचा गळा घोटून त्याला मारून टाकत चालले आहेत. समाजात वाढणाऱ्या आत्महत्या या चिंताजनक बनत चालल्या आहेत. पूर्वी आत्महत्या कोणालाही न समजता केली जात असे. पण आता तर ही आत्महत्या करताना ती सोशल मिडियाच्या माध्यामातून लाईव्ह करून केली जात आहे. तर मृत्यूचा स्टेटस ठेवून आत्महत्या करण्यात येत आहे. जिल्हयात गेल्या वर्षभरात ६०० पेक्षा अधिक जणांनी आत्महत्या केल्या आहेत. म्हणजेच जिल्हयात दिवसाला सरासरी दोन व्यक्ती आत्महत्या करत आहेत. या प्रश्नाचे उत्तर कशात शोधायचे हा प्रश्न आहे.
सामुहिक आत्महत्येचा प्रयत्न सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात सोनी येथे मुलगी पसंत नसल्याच्या कारणावरून कुंटुंबांत वाद झाले आणि या वादाचे रूपांतर आत्महत्येत झाले. पहिल्यांदा बापाने विषारी औषध पिऊन आत्महत्या केली तर त्याचा मृतदेह पाहून मुलाने आत्महत्या केली आहे. एकाच घरातील दोन कर्ते पुरुषांचा तात्काळ मृत्यू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण कुंटुंबच उध्दवस्त झाले आहे.
ही घटना ताजी असतानाच कवठेमहांकाळ तालुक्यातील नांगोळे येथील एकाच कुंटुंबातील चौघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यात दोन महिलांचा तात्काळ मृत्यू झाला आहे. तर दोघांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
यामध्ये सासू-सूनेचा मृत्यू झाला आहे. तर बाप आणि मुलगा दोघांची प्रकृती आता स्थिर आहे. पण हे कुंटुंब उध्दवस्त झाले.
या कुंटुंबांने कोणत्या कारणातून आत्महत्येचा प्रयत्न केला याबाबत अधिकृत कोणतीही माहिती पोलीसांच्याकडून देण्यात आली नाही. पण ही आत्महत्या आपल्यावर कोणी तरी करणी करते आहे या संशयातून झाली असावी अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच हे कुंटुंबही कर्जबाजारी झाले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण जोपर्यंत याबाबत या कुंटुंबांकडून अधिकृत माहिती देण्यात येत नाही तोपर्यंत याबाबत ठोस कारण समजू शकणार नसल्याचे पोलीसांकडून सांगण्यात आले. पंधरा दिवसात दोन कुंटुंबातील एकूण चार व्यक्ती आपले जीवन संपवतात ही घटना धक्कादायक आहे. त्यामुळे अशा घटनांना कसे रोखायचे हाच खरा सवाल आहे.
- सर्वाधिक आत्महत्या या कौटुंबिक कारणातून
जिल्हयात ज्या ६०० पेक्षा जास्त आत्महत्या घडल्या आहेत. त्यामधील सर्वाधिक आत्महत्या या कौटुंबिक कारणातून झालेल्या आहेत. कौटुंबिक कारणातून आणि कलहातून ४०० पेक्षा जास्त लोकांनी आत्महत्या केली आहे. यामध्ये ३०० पुरूष तर १०० स्त्रियांचा समावेश आहे. अनेकांना एकटेपणाची जाणीव होत आहे. त्यातून वाढणारे नैराश्य हे आत्महत्येकडे उचलले जाणारे पहिले पाऊल पडत आहे. नवीन पिढीने तर आपल्या घरातील मंडळींशी सातत्याने संवाद ठेवला पाहिजे, त्याचवेळी या आत्महत्या निश्चितच कमी होतील. ब्रेकअप होणे, परिक्षेत कमी मार्क पडणे, कर्जबाजारी होणे अशा अनेक गोष्टी या आत्महत्येला कारणीभूत आहेत. याशिवाय संशय हा महत्त्वाचा विषय आहे. तसेच अनेकजण आजाराला कंटाळून आत्महत्या करत आहेत. या घडणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी सातत्याने नैराश्यात गेलेल्या व्यक्तीशी बोलणे झाले पाहिजे तरच हे घडू शकते. अन्यथा अशा घटना थांबवणे अवघड बनू शकते.
- महिला संकटाला धीराने तोंड देतात पण पुरूष देत नाहीत…
जिल्हयात ज्या ६०० पेक्षा अधिक आत्महत्या झाल्या आहेत. त्यामध्ये ५५८ पुरूषांनी आत्महत्या केली आहे. तर १३८ महिल्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याचाच अर्थ ८० टक्के पुरूषांनी आणि फक्त २० टक्के महिलांनी आत्महत्या केल्या आहेत. महिला या कितीही संकट येवू दे त्या संकटाला धीराने तोंड देतात. पण पुरूष मात्र या संकटाला घाबरून आत्महत्या करतात. ही गोष्ट शेतकरी आत्महत्यांच्या अहवालातून प्रकर्षाने पुढे आली आहे. कोणत्याही संकटाला स्त्री जितक्या सक्षमपणे तोंड देवू शकते तितक्या सक्षमपणे पुरूष तोंड देवू शकत नाही. त्यामुळे स्त्रियांचे आत्महत्येचे प्रमाण कमी आहे असे म्हणावे लागेल.
- जिल्हयातील आत्महत्येची कारणे संख्या
कौटुंबिक कारणातून ४३०
आजारपणाला कंटाळून १३४
दारू, गर्दच्या नशेत ६२
वैवाहिक वादातून २२
बेरोजगार १२
दिवाळखोरीतून १०
प्रेमभंग ०९
प्रिय व्यक्तीचा मृत्यू ०७
परिक्षेत नापास होण्याने ०५
मालमत्तेच्या वादातून ०४
मुल न होणे ०१
एकूण ६९६








