Deepak Kesarkar : शासन आपल्या दारी कार्यक्रम कोल्हापुरात येत्या 13 जूनला होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच काही मंत्री उपस्थित असणार आहेत. शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि त्याचा लाभ मिळावा यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्रभर केलं जात आहे. शेतकरी संघटनांना भेटण्यासाठी खास स्वतंत्र वेळ देण्यात येणार आहे. यावेळी राजू शेट्टी यांच्याशी मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत. मात्र जाब विचारण्या अगोदर आपले प्रश्न मांडायचे असतात असा टोलाही राजू शेट्टी यांना केसरकर यांनी लगावला.मुख्यमंत्र्यांना राज्यातील अनेक प्रश्न हाताळायचे असतात मात्र ते शेतकऱ्यांना प्राधान्य देतात. शिंदे सरकारच्या काळात शेतकऱ्यांना जेवढा निधी मिळाला तेवढा आजपर्यंत कोणात्याच सरकारमध्ये मिळाला नाही. उर्वरित काही मागण्या असतील तर त्याचाही विचार होईल अशी प्रतिक्रिया पालकमंत्री दिपक केसरकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, कोल्हापूर आता पूर्णपणे शांत झालं आहे. हे छत्रपती शाहू महाराज आणि शिवाजी महाराजांच्या विचारांचे शहर आहे.असे प्रकार घडू नये यासाठी वेळेवर कारवाई व्हावी यासाठी पोलीसांना सूचना देण्यात आल्या आहेत.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोल्हापुरात येत असल्याने आणखी दिलासा मिळेल.विरोधी आमदारांना निधी दिला जात नाही असे नाही. गेल्यावर्षी देखील त्यांना निधी देण्यात आले आहेत.त्यांच्याशी मी चर्चा करेन.आमदार हसन मुश्रीफ आणि सर्व आमदार जेव्हा उपस्थित असतील तेव्हा देखील पुन्हा चर्चा होईल. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराज यांचा पगडा कोल्हापूरकरांवर आहे. ज्या दिवशी दंगल झाली त्यादिवशी कोल्हापूरकरांनी शांत राहण्याचे आश्वासन दिलं आणि त्यांनी ती पूर्णही केलं. जिल्ह्यात शांतता समिती तयार केली असल्याचेही ते म्हणाले.
दंगलीच्या बैठकिला सतेज पाटील यांना निमंत्रण दिलं गेलं नाही. यासंदर्भात बोलताना केसरकर म्हणाले की, या बैठकिला बंटी पाटील यांना आमंत्रण पोहचलं नाही याची दिलगीरी मी स्वत: व्यक्त केली.ते माजी पालकमंत्री आहेत. ज्येष्ठ नेते आहेत अशी चूक प्रशासनाकडून घडता कामा नये असे हे त्यांना मी सांगितलं.
दंगलीच्या दिवशी शहरात तणाव निर्माण झाला असताना जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांना शाहू महाराज यांनी बैठकिला येणार असल्याचं सांगितलं होते.मात्र त्यांना डावलण्यात आलं असा प्रश्न विचारताच केसरकर म्हणाले की,बैठक शाहू महाराजांच्या विचाराने झाली.शाहू महाराज यांचा मी आदर करतो.जेव्हा मी मंत्री झालो तेव्हा मी शाहू महाराजांचे आशीर्वाद घेतले. पण ज्यावेळी दंगलीसारखा प्रसंग घडतो त्यावेळी जेष्ठ व्यक्तींना रस्त्यावर आणलं जातं नाही.अशी परंपरा नाही त्यांचा योग्य तो मान ठेवला जातो.बैठकीत देखील वातावरण गरम होतं मात्र नंतर शांत झालं. तरीही मी त्यांना एक शांततेचा आवाहन करण्याची विनंती केली. त्यांनी रीतसर केलं. त्याचा परिणाम शहरात झाला. शहर शांत झाला. अनेक गोष्टी अनावधाने होतात.यात डावलंल जात नाही अस स्पष्टीकरण त्यांनी दिलं.
दंगलीत अनेकांच नुकसान झालं त्यांना भरपाई मिळणार का असा सवाल केला असता केसरकर म्हणाले की, दंगलीमध्ये ज्यांचे नुकसान झाले आहे त्याची जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन फूल ना फुलाची पाकळी मदत करण्यात येईल.भावनेच्या भरात घडून जात असतं यातून आंदोलने होतात आणि आंदोलने झाले की खटले दाखल होतात.मात्र तेही नंतर मागे घेतली जातात. यामुळे या प्रसंगात देखील सर्वांचे जामीन मंजूर झाले आहेत. तसेच खटले कशा पद्धतीचे आहेत बघून योग्य वेळी योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन केसरकर यांनी दिलं.