भिंत कोसळल्याप्रकरणी मनपाकडून बांधकामधारक-परवानाधारक अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस
प्रतिनिधी /बेळगाव
महादेव गल्ली येथे नक्याने बांधकाम करण्यात येणाऱया बहुमजली इमारतीच्या तळमजल्यासाठी खोदाई करताना शेजारील घराची भिंत कोसळून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. ही बाब महापालिकेच्या नगर योजना विभागाने गांभीर्याने घेतली असून इमारत बांधकामधारक आणि परवानाधारक अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
इमारत बांधकाम परवानगी देताना विविध नियमावली घालून दिलेल्या असतात. नियमावलीचे पालन करून खोदाई करणे किंवा बांधकाम करणे बंधनकारक आहे. मात्र सर्व नियमावलीकडे आणि सुरक्षेच्यादृष्टीने कोणतीच खबरदारी न घेता तळमजल्यासाठी खोदाईचे काम हाती घेण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी तळमजल्याची खोदाई करताना शेजारी असलेल्या घराची भिंत कोसळून एका वृद्ध कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी महापालिकेच्या नगर योजना विभागाने इमारत मालक आणि परवानाधारक अभियंत्यांना जबाबदार धरून नोटीस बजावली आहे.
महादेव गल्ली येथे व्यापारी आणि रहिवासी बहुमजली इमारतीचे बांधकाम करण्यात येत आहे. याकरिता महापालिकेने 25 नोव्हेंबर 2021 रोजी परवानाधारक अभियंत्यांना ‘सुप्रा ऑफ सुपरव्हीजन सर्टिफिकेट’ देऊन इमारत बांधकाम परवानगी दिली होती. सदर इमारतीच्या बांधकामावेळी तळघरासाठी खोदाई करताना दि. 28 रोजी कोणतीच सुरक्षा व खबरदारी घेतली नव्हती. परिणामी शेजारी असलेल्या घराची भिंत कोसळून कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी पाहणी केली असता सुरक्षेच्यादृष्टीने कोणतीच दक्षता घेण्यात आली नव्हती. बेजबाबदारपणे काम केल्याने हा अपघात घडला आहे. त्याबद्दल महापालिका कायद्यानुसार कारवाई करून तुमचा अभियंता परवाना रद्द का करू नये? अशी कारणे दाखवा नोटीस अभियंते मिलिंद कृष्णा बेळगावकर यांना बजावण्यात आली आहे. तसेच याबद्दल तीन दिवसांच्या आत स्पष्टीकरण देण्याची सूचना करण्यात आली आहे.
सात दिवसांत स्पष्टीकरणाची सूचना
इमारत मालकांनी देखील बेसमेंटसाठी खोदाई करताना आवश्यक खबरदारी घेतली नसल्याने प्राणहानी झाली. सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना राबविल्या नसल्याने प्राणहानीची घटना घडली आहे. त्यामुळे सदर इमारत परवानगी महापालिकेच्या कायद्यानुसार रद्द का करू नये? अशी कारणे दाखवा नोटीस इमारत मालक महेंद्र जैन, सुंदरबाई जैन, विजय पोरवाल (जैन) यांना बजावली आहे. तसेच याबाबत सात दिवसांत स्पष्टीकरण देण्याची सूचना नोटीसीद्वारे नगर योजना विभागामार्फत महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांनी बजावली आहे.