शहापूर येथील ‘त्या’ प्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी
बेळगाव : शहापूर येथील पी. बी. रोड ते जुन्या धारवाड रोडपर्यंत स्मार्ट सिटी अंतर्गत बेकायदेशीररित्या काम करण्यात आले. काही जणांची जागा वाचविण्यासाठी चक्क सीडीपी बदलून काही जणांना वेठीस धरण्यात आले. त्यानंतर संबंधित जागा मालकाने उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायालयाने त्यांना नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. याला सर्वस्वी स्मार्ट सिटीचे अधिकारी जबाबदार असून त्यांच्याकडूनच ही रक्कम वसूल करावी, अशी मागणी आपचे राजकुमार टोपण्णावर आणि भ्रष्टाचार निर्मूलन परिवार संघटनेचे अध्यक्ष सुजित मुळगुंद यांनी केली आहे. कन्नड साहित्य भवन येथे पत्रकार परिषदमध्ये स्मार्ट सिटी कामांमध्ये कशाप्रकारे बेकायदेशीर कामे झाली आहेत, याचा पाढाच त्यांनी यावेळी वाचला. राजकीय दबावातून कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे अनेकांवर अन्याय झाला आहे. आपल्या समर्थकांना फायदा व्हावा या दृष्टीने प्रयत्न केले गेले आहेत. याला स्मार्ट सिटीचे अधिकारी बळी पडले आहेत. आता संबंधित जागा मालकाला उच्च न्यायालयाने नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. आता त्यांना नुकसानभरपाई कोण देणार? असा प्रश्नदेखील उपस्थित करण्यात आला आहे.
शहापूर, जुना धारवाड रोडला जोडणारा हा रस्ता सीडीपीप्रमाणे केला असता तर ही समस्या निर्माण झाली नसती. या रस्त्यावरच प्लॉट पाडवून त्यामध्ये बांधकाम करण्यात आले आहे. याला सर्वस्वी स्मार्ट सिटीचे व्यवस्थापक आणि इतर अधिकारी जबाबदार असल्याचा आरोपदेखील राजकुमार टोपण्णावर यांनी केला आहे. यावेळी भ्रष्टाचर निर्मूलन परिवार संघटनेचे अध्यक्ष सुजित मुळगुंद यांनीही स्मार्ट सिटीमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. कामांचा दर्जा निकृष्ट आहे. त्याची संपूर्ण चौकशी करावी. वास्तविक, या प्रकरणासह इतर प्रकरणांचा तपास करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वत:हूनच त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. या सर्व प्रकरणांची लोकायुक्तमार्फतच चौकशी करावी. या प्रकरणामध्ये जे अधिकारी सामील आहेत त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे. अन्यथा भविष्यात बेळगावच्या जनतेला नाहक भुर्दंड तसेच त्रास सहन करावा लागणार आहे, असेदेखील त्यांनी यावेळी सांगितले.









