महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकाधिक उमेदवार विधानसभेत पाठवा : खासदार संजय राऊत यांचे भावनिक आवाहन

बेळगाव : मागील 66 वर्षांपासून बेळगावसह संपूर्ण सीमाभागातील मराठी भाषिक न्यायासाठी दाद मागत आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्राला एक इंचही जमीन देणार नाही, असे सांगितले होते. आम्ही इंचभराचा विचारच करत नाही. आम्हाला 25 लाख मराठी भाषिकांचा संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात न्यायचा आहे. त्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकाधिक उमेदवार विधानसभेत पाठवा, असे भावनिक आवाहन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार
अॅड. अमर येळ्ळूरकर, रमाकांत कोंडुस्कर, आर. एम. चौगुले, मुरलीधर पाटील, मारुती नाईक यांच्या प्रचारार्थ बुधवारी संयुक्त महाराष्ट्र चौक येथे जाहीर सभा घेण्यात आली. या सभेमध्ये खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जहरी टीका करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच काँग्रेसवरही हल्लाबोल केला. राऊत पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगभरातील देशांमधील तंटे मिटविण्यासाठी प्रयत्न करीत असतात. परंतु मागील 66 वर्षांपासून खितपत पडलेला सीमाप्रश्न सोडविण्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे. आमचा वाद हा कुठल्याही भाषेशी अथवा राज्याशी नसून तो केंद्र सरकारशी आहे. भाजपचे हिंदुत्व हे बेगडी असून अनेकवेळा त्यांनी ते सिद्ध करून दाखविले आहे. हिंदुत्ववादी काम करणारी शिवसेना फोडताना तुम्हाला हिंदुत्व आठवले नाही का? असा उलट प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
महाराष्ट्रातील नेत्यांना काळे झेंडे दाखवा
एकीकडे मराठी माणसाला महाराष्ट्रात सामील करण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेत गळे काढले जातात. पण दुसरीकडे त्याच मराठी भाषिकांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी राष्ट्रीय पक्षांचे नेते मंडळी येतात. मराठी भाषिकांच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या या नेत्यांविरोधात सीमावासियांनी काळे झेंडे दाखवावे आणि आपला रोष व्यक्त करावा, असे आवाहन खासदार संजय राऊत यांनी केले. बेळगाव उत्तरचे उमेदवार अॅड. अमर येळ्ळूकर म्हणाले, मागील 25 वर्षांत बेळगाव शहराला म. ए. समितीचा आमदार मिळालेला नाही. याचाच गैरफायदा घेऊन महानगरपालिकेवरचा भगवा उतरविण्यात आला. त्याचबराब्sार मनपाचे कानडीकरण करण्यात आले. म. ए. समितीचे उमेदवार निवडून आल्यास महानगरपालिकेवर पुन्हा एकदा डौलाने भगवा फडकवू आणि मराठीतून कामकाज पूर्ववत करू, असे आश्वासन त्यांनी दिले. शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख विजय देवणे यांनी भाजपवर सडकून टीका केली. महाराष्ट्र एकीकरण समितीने यावेळी एक उमेदवार दिल्याने विजय निश्चित आहे. बेगडी हिंदुत्व जपणाऱ्या भाजपच्या उमेदवारापेक्षा चळवळीतील नेत्यांना निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले. जोवर महाराष्ट्रातील शिवसैनिक जिवंत आहे तोवर सीमावासियांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. भाजपला ठेचायची ही नामी संधी असून त्यांचा पराभव निश्चित असल्याचे ते म्हणाले. दिनेश ओऊळकर यांनी सर्वोच्च न्यायालयातील दाव्याबाबत माहिती देत सर्वोच्च न्यायालय सीमावासियांच्या बाजुनेच न्याय देईल, असा विश्वास व्यक्त केला. शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, प्रत्येक ठिकाणी पोलीस तसेच पैशांचा वापर करून दबावतंत्र वापरले जात आहे. हे सगळे झुगारून म. ए. समितीच्या पाचही उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. मालोजी अष्टेकर व मनोहर किणेकर यांनी म. ए. समितीला मोठे यश मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. व्यासपीठावर मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, कोल्हापूर जिल्हा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रभाकर खांडेकर, अॅड. एम. जी. पाटील, उमेदवार अॅड. अमर येळ्ळूरकर, रमाकांत कोंडुस्कर, आर. एम. चौगुले, मारुती नाईक यासह इतर उपस्थित होते.









