मुख्यमंत्री केजरीवालांनी ईडीसमोर हजर होणे टाळले : नवा समन्स जारी होण्याची शक्यता
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे अबकारी धोरण घोटाळ्यातील चौकशीप्रकरणी तपास यंत्रणा ईडीसमोर गुरुवारी हजर राहिले नाहीत. याऐवजी केजरीवाल यांनी ईडीला एक पत्र पाठवून समन्स मागे घेण्याची सूचना केली आहे. संबंधित समन्समध्ये मी संशयित आहे का साक्षीदार हे नमूद नसल्याचे केजरीवालांनी या पत्राद्वारे ईडीला कळविले आहे. तर ईडीकडून केजरीवालांना आता नवा समन्स बजावला जाण्याची शक्यता आहे. ईडीने 30 ऑक्टोबर रोजी केजरीवालांना समन्स बजावून 2 नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. या पार्श्वभूमीवर केजरीवालांनी गुरुवारी ईडीला पत्र पाठवून ही नोटीस बेकायदेशीर आणि राजकारणाने प्रेरित असल्याचे म्हटले आहे. याचबरोबर गुरुवारी सकाळी केजरीवाल हे स्वत:च्या निवासस्थानातून विमानतळासाठी रवाना झाले. केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी मध्यप्रदेशच्या सिंगरौली येथे जाहीर सभा घेत आप उमेदवारांसाठी प्रचार केला आहे.
घोटाळ्याप्रकरणी तुम्ही मला साक्षीदार मानत आहात का संशयित हे समन्समध्ये स्पष्ट नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून बोलावत आहात का आम आदमी पक्षाचे संयोजक म्हणून हे देखील यात नमूद नाही. हा समन्स एकप्रकारे माशासाठी लावलेल्या जाळ्याप्रमाणे असल्याचा दावा केजरीवालांनी ईडीच्या सहाय्यक संचालकाला पाठविलेल्या पत्रात केला आहे. भाजपच्या इशाऱ्यावर ईडीकडून हा समन्स बजावण्यात आला आहे. 30 ऑक्टोबर रोजी दुपारी भाजप नेत्यांनी केजरीवालांना लवकरच चौकशीसाठी बोलावून अटक करण्यात येईल असे म्हणण्यास सुरुवात केली होती. त्याचदिवशी संध्याकाळी मला समन्स मिळाला. यातून माझी प्रतिमा मलीन करण्यासाठी समन्सची कल्पना भाजपच्या नेत्यांना पूर्वीच देण्यात आली होती हे स्पष्ट होते असा दावा केजरीवालांनी केला आहे.
मुख्यमंत्री म्हणून मोठी जबाबदारी
देशात 5 राज्यांमध्ये लवकरच निवडणूक होणार आहे. आम आदमी पक्ष प्रत्येक ठिकाणी निवडणूक लढवत आहे. पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि स्टार प्रचारक या नात्याने मला निवडणूक प्रचारासाठी प्रवास करावा लागणार आहे. दुसरीकडे मी दिल्लीचा मुख्यमंत्री देखील आहे. दिवाळीचा सण तेंडावर असल्याने माझ्याकडे अधिकृत स्वरुपात अनेक कामे आहेत, असे म्हणत केजरीवालांनी पत्राच्या अखेरीस समन्स मागे घेण्याची मागणी केली आहे.
केजरीवाल अबकारी घोटाळ्याचे सूत्रधार
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल गुरुवारी ईडीसमोर हजर न राहिल्याचे स्पष्ट झाल्यावर भाजपने आप संयोजकावर सडकून टीका केली आहे. अरविंद केजरीवाल हे ईडीच्या प्रश्नांना उत्तर देणे आणि सत्याला सामोरे जाण्यापासून पळ काढत आहेत. ईडीसमोर हजर न राहून त्यांनी एकप्रकारे अबकारी घोटाळ्यातील सहभागाची कबुलीच दिली आहे. केजरीवाल जर भ्रष्टाचारी नसतील तर का घाबरत आहेत? केजरीवाल हे घोटाळ्याचे सूत्रधार असल्याने वाचू शकत नाहीत. केजरीवालांना तपास यंत्रणा, स्वत:चे सहकारी, निवडणूक प्रणाली, कायदा यापैकी कशावरही विश्वास नसल्याची टीका भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केली आहे.









