पुणे / प्रतिनिधी :
शरद पवारांचे राजकारण मी खूप वर्षांपासून पाहत असून, त्यांचे हे असेच आहे. पवार काका-पुतण्यांची मिलीभगत आहे, असा आरोप मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी येथे केला. मुंबई-गोवा महामार्गाचे काम 17 वर्षांपासून सुरू असून, एखादा रस्ता निर्माण करायला इतके दिवस लागतात का, असा सवालही त्यांनी केला.
पुण्यात मनसेच्या शाखाध्यक्ष, विभाग अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांची राज यांनी बैठक घेतली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज म्हणाले, महाराष्ट्राचे राजकारण सध्या कुठल्या दिशेला जात आहे, हे कळण्यापलीकडचे आहे. राज्याला विरोधी पक्षनेता, तर सोडाच. पण विरोधी पक्षही नाही. कोणता पक्ष विरोधी पक्ष आहे, हे सध्या मला कळतच नाही. आमचा एकच पक्ष सध्या विरोधी पक्ष दिसतो आहे. बाकी सगळय़ांचेच लागेबांधे आहेत. अजित पवार यांचा शपथविधी झाला, त्या दिवशी मी पहिल्या एका तासात एक ट्वीट केले होते. त्यात मी पहिली टीम रवाना झाली, असे म्हटले होते. सगळे तसेच होत आहे. किती खोटे वागावे याला काही मर्यादा आहेत की नाहीत? खरे तर हा सगळा देखावा आहे. प्रत्यक्षात काका व पुतण्यांची मिलीभगत आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील रस्त्यांवर खड्डे आहेत अन् तुम्ही कशावर टोल घेता?, यावर भाजप बोलणार का? हे प्रश्न भाजपला विचारले पाहिजेत. 17 वर्ष झाले मुंबई-गोवा रस्त्याचे काम सुरू आहे. 17 वर्ष कोणत्या रस्त्याला लागतात का? रस्त्यावर खड्डे पडले टोल कसले घेताय?. टोलचे पैसे नेमके कुणाला मिळतात, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.