बटाटे, कांदा, अंडी, मांस-मासे अन् फळांच्या किमतीत वाढ
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
डिसेंबर महिन्यात घाऊक महागाईदर वाढून 2.37 टक्क्यांवर पोहोचला आहे. यापूर्वी नोव्हेंबरमध्ये हा दर 1.89 टक्के राहिला होता. ऑक्टोबर महिन्यात हे प्रमाण 2.36 टक्के होते. कांदा, बटाटा, अंडी, मांस-मासे आणि फळांच्या घाऊक किमती वाढल्या आहेत. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून मंगळवारी ही आकडेवारी जारी करण्यात आली आहे.
दैनंदिन गरजेच्या सामग्रींचा महागाईदर 5.49 टक्क्यांवरून वाढत 6.02 टक्के झाला आहे. अन्नधान्याचा महागाईदर 8.92 टक्क्यांवरून कमी होत 8.89 टक्के झाला आहे. इंधन अन् ऊर्जेचा घाऊक महागाई दर उणे 5.83 टक्क्यांवरून उणे 3.79 टक्क्यांवर आला आहे. निर्मित उत्पादनांचा घाऊक महागाई दर 2 टक्क्यांवरून वाढत 2.14 टक्के झाला आहे.
बटाट्याचा घाऊक महागाई दर 82.79 टक्क्यांवरून वाढत 93.20 टक्के राहिला. अंडी, मांस, माशांचा घाऊक महागाई दर 3.16 टक्क्यांवरून वाढत 5.43 टक्के राहिला आहे. भाज्यांचा घाऊक महागाई दर 28.57 टक्क्यांवरून वाढत 28.65 टक्के राहिला.
किरकोळ महागाई दरात घट
डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाई दर 4 महिन्यांच्या नीचांकी स्तरावर आला आहे. सोमवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार किरकोळ महागाई दर 5.22 टक्के झाला आहे. नोव्हेंबरमध्ये हा दर 5.48 टक्के राहिला होता. तर ऑगस्ट महिन्यात 3.65 टक्के राहिला होता.









