उणे 0.26 टक्क्यांची नोंद : सलग सहाव्या महिन्यात दिलासा
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील घाऊक महागाई दर सलग सहाव्या महिन्यात शून्याच्या खाली राहिला आहे. सप्टेंबरमध्ये तो -0.26 टक्के नोंदवला गेला. यापूर्वीच्या ऑगस्ट महिन्यात घाऊक महागाईचा दर -0.52 आणि जुलै महिन्यात -1.36 टक्क्मयांवर होता. गेल्या तीन महिन्यातील आकडे दिलासादायी असले तरी तुलनात्मकरित्या महागाईत संथगतीने वाढ होत असल्याचे दिसत आहे.
सरकारने रासायनिक आणि रासायनिक उत्पादने, खनिज तेल, कापड, मूलभूत धातू आणि खाद्यपदार्थांच्या किमतीत गेल्यावषीच्या याच महिन्याच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये घट झाल्याचे कारण दाखवून घाऊक महागाई शून्याच्या खाली राहण्याचे कारण दिले आहे. सप्टेंबर महिन्यात भाज्यांच्या महागाईचा दर 3.39 टक्क्मयांवर आला, तो ऑगस्टमध्ये 26.14 टक्के होता. सप्टेंबर महिन्यात धान्याच्या महागाईचा दर 10.95 टक्के होता. इंधन आणि ऊर्जा क्षेत्रातील महागाई सप्टेंबरमध्ये उणे 0.11 टक्क्मयांनी घसरली.
सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाई दरात घट झाली होती. देशाची किरकोळ महागाई ऑगस्टमध्ये 6.83 टक्क्मयांवरून सप्टेंबरमध्ये वार्षिक आधारावर 5.02 टक्क्मयांवर घसरली. सप्टेंबरमध्ये अन्नधान्य महागाई 6.56 टक्के होती, जी ऑगस्टमध्ये 9.94 टक्के होती. ग्रामीण आणि शहरी भागांबद्दल बोलायचे झाल्यास, सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाई दर अनुक्रमे 5.33 टक्के आणि 4.65 टक्के होता.









