भाज्या स्वस्त, डाळींचे भाव वाढले : दैनंदिन गरजेच्या वस्तूही स्वस्त
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जानेवारी महिन्यात घाऊक महागाई 2.31 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. डिसेंबरमध्ये तो 2.37 टक्के होता. दैनंदिन गरजेच्या वस्तू आणि अन्नपदार्थ स्वस्त झाल्यामुळे महागाई कमी झाली आहे. अन्नपदार्थांमध्ये भाज्यांच्या किमतीत घट झाल्यामुळे यावर्षी जानेवारीमध्ये घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर 2.31 टक्क्यांपर्यंत कमी झाला. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने शुक्रवार, 14 फेब्रुवारी रोजी हे आकडे जाहीर केले. जानेवारीमध्ये घाऊक महागाईप्रमाणेच किरकोळ महागाई दर पाच महिन्यांची नीचांकी पातळी गाठत 4.31 टक्क्यांवर आला आहे. डिसेंबरमध्ये तो 5.22 टक्के होता.
दैनंदिन वापराच्या वस्तूंमधील महागाई 6.02 टक्क्यांवरून 4.69 टक्क्यांपर्यंत कमी झाली. अन्नधान्यांमधील महागाई 8.89 टक्क्यांवरून 7.47 टक्क्यांपर्यंत कमी झाली. तथापि, इंधन आणि विजेचा घाऊक महागाई दर -3.79 टक्क्यांवरून -2.78 टक्क्यांपर्यंत वाढला. तसेच उत्पादित वस्तूंचा घाऊक महागाई दर 2.14 टक्क्यांवरून 2.51 टक्क्यांपर्यंत वाढला. धान्याचा घाऊक महागाई दर 6.82 टक्क्यांवरून 7.33 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. डाळींचा घाऊक महागाई दर 5.02 टक्क्यांवरून 5.08 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. मात्र, भाजीपाला महागाई 28.65 टक्क्यांवरून 8.35 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. दुधाचा घाऊक महागाई दर 2.26 टक्क्यांवरून 2.69 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.









