अन्नपदार्थ, भाज्या, फळे यांचे भाव तुलनेने कमी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाईदरापाठोपाठ घाऊक महागाई दरातही घट झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. खाद्यान्ने, अन्नपदार्थ, भाज्या आणि फळे यांच्या दरांमध्ये तुलनेने घट झाल्यामुळे घाऊक आणि किरकोळ महागाईच्या दरांमध्येही घट झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
ऑक्टोबरमध्ये दोन्ही महागाई दरांनी कळस गाठला होता. किरकोळ महागाई दर त्या महिन्यात गेल्या दोन वर्षांमधील सर्वोच्च पातळीवर होता. मात्र, नोव्हेंबरात नवा कृषीमाल बाजारात आल्याने मागणी आणि पुरवठा यांच्यातील अंतर कमी होऊन दरही कमी झाले आहेत. नोव्हेंबर महिन्यात घाऊक महागाईचा दर 1.89 टक्के असा आहे. ऑक्टोबरमध्ये तो 2.36 टक्के तर सप्टेंबरात तो 1.84 टक्के होता.
दैनंदिन वस्तूंच्या दरात घट
दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंच्या दरातही तुलनेने घट झाल्याने ग्राहकांवरील ओझे काही प्रमाणात दूर झाले आहे. घाऊक महागाई दराचा हा गेल्या तीन महिन्यांमधील नीचांक आहे. विशेषत: भाज्यांच्या दरात ऑक्टोबर आणि सप्टेंबरच्या तुलनेत 25 ते 50 टक्के घट झाल्याचे दिसते, अशी माहिती देण्यात आली.
बटाटा स्थिर, कांदा स्वस्त
भाज्यांच्या महागाई दरात ऑक्टोबरात 63.04 टक्के वाढ झाली होती. ती नोव्हेंबरात जवळपास निम्म्यावर आली आहे. बटाट्याच्या दरात फारशी घट नोव्हेंबरात झाली नाही. तथापि, कांदा घाऊक दराच्या संदर्भात बराच स्वस्त झाला आहे. कांद्याचा महागाई दर ऑक्टोबरच्या तुलनेत केवळ 2.85 टक्के राहिला.
इंधन महागाईत कपात नाही
इंधन आणि वीज यांचा महागाई ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये जवळपास त्याच पातळीवर राहिला आहे. ऑक्टोबरात वीजेचा महागाई दर 5.79 टक्के होता. तो नोव्हेंबरात 5.83 टक्के इतका होता. तर इंधनाचा महागाई दर आहे त्याच पातळीवर राहिला आहे, अशी माहिती सांख्यिकी विभागाने दिली आहे.
विनिर्मित वस्तूंचा दर चढाच
विनिर्मिती वस्तूंच्या (मॅन्युफॅक्चरिंग प्रॉडक्टस्) महागाई दरात मात्र घट न होता काहीशी वाढच झालेली दिसून येते. ऑक्टोबरात हा दर 1.50 टक्के होता. आता नोव्हेंबरमध्ये तो 2 टक्के झाल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, विनिर्मित वस्तूंच्या मागणीत वाढ झाल्यामुळे दर घसरलेले नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
किरकोळ महागाईही कमी
काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडून किरकोळ महागाई निदेशांकाचीही माहिती देण्यात आली होती. नोव्हेंबरमध्ये किरकोळ महागाई दर 6.21 टक्के इतका होता. तो नोव्हेंबरात काहीसा कमी होऊन 5.48 टक्के झाला आहे. ग्राहक मूल्य निर्देशांकानुसार खाद्यपदार्थांचा महागाई दर ऑक्टोबरच्या तुलनेत जवळपास 1 टक्का कमी झाला आहे. महागाईवाढीवर नियंत्रण आल्यास लोकांकडे अधिक पैसा शिल्लक राहून ते अन्य वस्तू विकत घेण्यास प्रवृत्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर वस्तूंची मागणीही वाढण्याची शक्यता असून देशाच्या विकासदरावर याचा सकारात्मक परिणाम होणे शक्य आहे, असे मत काही अर्थतज्ञांनी व्यक्त केले.
तुलनेने भारताची स्थिती समाधानकारक
महागाईची समस्या सध्या साऱ्या जगाला भेडसावित आहे. अनेक विकसीत देशांमध्येही महागाई वाढल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीतच अनेकांचा पैसा संपत असल्याची वृत्ते आहेत. त्यामुळे लोकांनी अन्य वस्तूंची खरेदी कमी केल्याचे दिसून येत आहे. भारतातही अशी स्थिती उद्भवताना दिसत असली, तरी महागाई आणि विकास यांचा समतोल भारतात इतर देशांच्या तुलनेत समाधानकारक आहे
घट अधिक काळ टिकणे आवश्यक
ड महागाई नियंत्रणात राहिल्यास बिगर जीवनावश्यक वस्तूंची मागणी वाढणार
ड दैनंदिन वस्तूंच्या महागाई दरात नोव्हेंबरमध्ये ऑक्टोबरच्या तुलनेत कपात
ड वीज, इंधनाचे दर स्थिर, विनिर्मित वस्तूंच्या महागाई दरात काहीशी वाढच









