अध्याय तिसावा
भगवंत जराव्याधाला म्हणाले, तुझी देहबुद्धी जागृत असल्याने तुला असे वाटते की, तू मारलेल्या बाणाने माझा वेध घेतला आणि म्हणून तू स्वत:ला अपराधी समजत आहेस. मुळातच तात्पुरते अस्तित्व असलेल्या देहाचा अभिमान बाळगून तुझ्या हातून पाप घडले अशी कबुली देत आहेस आणि त्या पापाचे परिमार्जन होण्यासाठी मी तुला देहदंड द्यावा अशी प्रार्थना करत आहेस.
आता तुला तू पाप केले आहेस असे वाटतच असेल तर त्या पापाचे परिमार्जन मी तुला देहदंड देऊन होणार नसून त्यासाठी केवळ तुला होणारे माझे दर्शन पुरेसे आहे. सांगायचे विशेष म्हणजे, माझे नुसते नाम घेतले तर कोटी कोटी महापातके नष्ट होतात आणि तुला तर माझे प्रत्यक्ष दर्शन झाले. माझी क्षणार्ध गाठ पडावी म्हणून काही लोक दऱ्याखोऱ्यातून भटकत असतात, काही गुहेत राहून तपश्चर्या करत असतात, काही योगयागाचे अनुष्ठान करत असतात, तर काही हटयोगी बनतात. कित्येक लोक निरनिराळे नेम करून त्याचे काटेकोर पालन करण्यासाठी अतिशय कष्ट उपसत असतात पण त्यांना मी स्वप्नातही भेटत नाही. असे असताना तू मात्र मला प्रत्यक्षात बघितलेस. तुझे भाग्य किती थोर असेल ह्याची तू कल्पना केलेली बरी! मग तू पापी असशीलच कसा? माझे दर्शन झाले रे झाले की, सर्व पातकांचे निर्दलन होते हे लक्षात घेतले की, तू तर परिपूर्ण पुण्यात्मा आहेस मग तू पापाभिमान का धरतोस? पापाभिमानाने अधोगती होते तर पुण्याच्या अभिमानाने स्वर्गप्राप्ती होते आणि जे निराभिमानी असतात त्यांना माझी प्राप्ती
होते हे माझे सत्यवचन आहे हे लक्षात घे. परब्रह्म परमात्मा श्रीकृष्णाला आपण निर्वाणबाण मारण्याचे दारूण अनिवार पाप तुझ्याहातून घडले असे तू मानतोस पण एक लक्षात घे जेव्हा लोखंड परीसाला मिठी मारते तेव्हा त्याचे सोन्यात रुपांतर होते. एव्हढेच काय लोखंडाच्या घणाने जरी परीसावर घाव घातले तरी त्या लोखंडी घणाचे सोनेच होते. त्याप्रमाणे भक्ताने माझी भेट घेतली की, त्याची पापे तोंड काळे करतातच पण एखाद्याने द्वेषपूर्ण नजरेने जरी माझ्याकडे पाहिले तरी त्याची सर्व पापे तत्काळ नष्ट होतात. थोडक्यात माझ्याकडे कसंही पाहिलं तरी त्याचा उद्धार होतो. मग त्याचा उद्देश चांगला असो की वाईट. जेव्हा मनुष्य इतरांचा अपराध करतो तेव्हा त्याचे अध:पतन होते पण जर त्याने माझा अपराध केला तर त्यांची कायमची मुक्तता होते. जर माझा अपराध करून तो नरकात गेला तर मग माझे सामर्थ्य काय राहिले? इतरांच्यात आणि माझ्यात हाच फरक आहे. एखाद्याने माझा अपराध केला तर त्याला सुख मिळते. त्याला मुक्तीचे वैभव आणि त्यांची भीती नष्ट होते. त्याने माझा अपराध जरी केलेला असला तरी मी त्याचा उद्धारच करतो. एखाद्याने विष म्हणून जरी अमृत प्यायले तरी तो अमर होतोच होतो कारण तो अमृताचा गुणच आहे. त्याप्रमाणे दोशाने जरी एखाद्याला माझे दर्शन घडले तरी मी त्याला पवित्र करतो. समजा एखाद्याने जाणूनबुजून घराला आग लावली तर अग्नी ते घर जाळून भस्म केल्याशिवाय सोडत नाही पण समजा एखाद्याने चुकून एखादी उदबत्ती जरी घरातल्या कापडावर ठेवली तरी तो कपडा पेट घेऊन घरादाराचे भस्म करायला मागेपुढे पहात नाही. त्याप्रमाणे मुद्दामहून असुदे, द्वेषाने असुदे जो माझे दर्शन घेईल तो परमपवित्र होईल हे लक्षात घे. माझी अत्यंत भक्ती करणाऱ्या प्रल्हादाचा शब्द खरा करण्यासाठी केवळ मी अवतार घेतला आणि त्या अवतारात त्याच्यावर अन्याय करणाऱ्या आणि माझा आत्यंतिक द्वेष करणाऱ्या प्रल्हादाच्या बापाला त्याला मिळालेल्या वराचे नियम पाळून ठार मारले. ह्यात प्रल्हादाचा उद्धार तर झालाच पण हिरण्यकश्यपूचाही मी उद्धार केला. मी उद्धार केलेल्यात जरासंध, शिशुपाल, कंस तसेच माझा द्वेष करणाऱ्या अनेकांचा समावेश आहे.
क्रमश:








