ऐन पावसाळ्यात तलावाची पाणीपातळी 22 फुटांवर :वाढत्या अतिक्रमणामुळे तलावात अपुरा पाणी साठा
कोल्हापूर (सागर पाटील)
गत वर्षी जुलै महिन्यात दहा तारखेच्या जवळपास कळंबा ओसंडून वाहत होता मात्र तलाव परिसरातील वाढती अतिक्रमणे यामुळे ऐन पावसाळ्यात तलावाच्या पाणी साठा 22 फुटांवर आहे. ऐतिहासिक कळंबा तलाव कधी ओसंडून वाहणार याची आस नागरिकांना लागली आहे. गेल्या चार दिवसापासून जिल्ह्यात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धरणाची पाणी पातळी झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. मात्र कळंबा तलावाची पाणी पातळी अद्याप 22 फुटांवर आहे. कात्यानी परिसरातुन येणाऱ्या मुख्य सात नाले – ओढे आहेत. मात्र नाले – ओढे यांवर अतिक्रमण करत नाल्याची पात्र मुजवून नाले पात्र अरुंद करत बांधकाम व्यावसायिकांनी भूखंड व्यावसायिक यांनी अतिक्रमण केल्याने तलावात कमी प्रमाणात पाणी येत आहे त्यामुळे तलाव भरण्यासाठी काहीसा वेळ लागत आहे.
पाणलोट क्षेत्रात वाढती बांधकामे नाले- ओढे सफाईकडे केलेले दुर्लक्ष पिण्याच्या पाण्यासाठी महापालिका व ग्रामपंचायत प्रशासनाने केलेल्या नियोजन शुन्य कारभारामुळे यंदा पाणी पातळी 5 फुटांवर आली होती. परिणामी महापालिकेने पाणी उपसा बंद केला तसचे कळंबा गावाचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊन गावाला अनियमित व कमी दाबाने गावाला पाणीपुरवठा केला होता. तसेच पाणलोट मध्ये वाढती अतिक्रमण ग्रामपंचायत व प्राधिकरण यांनी सोईस्कर दुर्लक्ष केले असून तलावातील पाणीपातळी वाढ होण्यात अडचणी निर्माण होत आहेत. शहरात २०१ ९ पाठोपाठ २०२१ मध्ये आलेल्या महापुरात कळंबा तलावाचे महत्त्व अधोरेखित झाले. महापालिकेचे पंपिंग स्टेशन पाण्याखाली गेल्याने शहराचा पाणीपुरवठा बंद झाला होता पाणीबाणीच्या संकटात शुद्ध ऐतिहासिक जलसाठा असलेल्या कळंबा तलावाने शहरवासियांची तहान भागवली. संकटकाळात मदतीला धावून आलेल्या कळंबा तलावाचे संवर्धन होणे गरजेचे आहे.
गेल्या वर्षी जुलै महिन्यात दहा तारखेच्या जवळपास कळंबा पूर्ण पणे भरला होता तलावाची पाणी पातळी 27 फुटांवर पोहचली होती. तर गत वर्षी चार ते पाच वेळा सांडव्यावरून पाणी बाहेर पडले होते मात्र यंदा जुलै महिना अर्धा संपला तरी तलावाची पाणी पातळी मात्र अद्याप 22 फुटांवर पोहचली आहे.
जबाबदारीबाबत प्रशासनामध्ये सावळा गोंधळ पाणलोटमधील बांधकाम नियमावलीबाबत प्रशासनामध्येच सावळा गोंधळ आहे. तलाव कळंबा ग्रामपंचायतीच्या हद्दीत असला तरी त्याच्या देखभालीची जबाबदारी महापालिकेकडे आहे. मात्र मनपा अधिकाऱ्यांना तलावाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. तहसील , प्राधिकरणाच्या कृपेने बांधकामांना परवाना मिळत आहे. मात्र पाणलोटमधील नियमावलीची प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनाच फारशी माहिती नाही. तर पाटबंधारे विभागाकडून तलाव अखत्यारीत येत नसल्याचे सांगितले जाते. जल प्रदुषणानंतर प्रदूषण नियंत्रण महामंडळाला जाग कधी येणार . यामुळे तलावाच्या जबाबदारीबाबत प्रशासनामध्ये सावळा गोंधळ असल्याने पाणलोटमधील बांधकामे रोखणार कोण असा प्रश्न आहे.









