कोल्हापूर / अहिल्या परकाळे :
बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्यावतीने बांधकाम कामगारांसाठी विविध योजना आहेत. या योजनांच्या लाभासाठी कामगारांना नूतनीकरण, नावनोंदणी, मेडिक्लेम, भांडी, हत्यारे, शिष्यवृत्तीr अशा 32 योजनांसाठी अर्ज भरावे लागतात. पुर्वी पोर्टलच्या माध्यमातून घरबसल्या कामगार मोबाईलवरून अर्ज भरत होते. परंतु सरकारने सेतू केंद्र उभारून ठेकेदाराच्या माध्यमातून अर्ज भरण्याचे आदेश दिले. एका तालुक्याला एकच केंद्र असल्याने बांधकाम कामगार मध्यरात्रीपासूनच रांगेत उभे राहू लागले आहेत. प्रत्यक्षात सेतू केंद्रावरील एजंटांचीच चलती असल्याने चार–पाच दिवस मार्केट यार्डात वस्ती करूनही नावनोंदणी होईल, याची कामगारांना शाश्वती नाही. त्यामुळे सेतू केंद्रावरील एजंटांना कोण रोखणार? असा प्रश्न आहे.
रात्रीचा दिवस करून बांधकाम कामगार महिला या मार्केट यार्डसारख्या ठिकाणी रात्रीच्यावेळी राहत आहेत, ही कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. तरीही जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. ठेकेदार आणि एजंटांच्या फायद्यासाठी महिलांचा जीव टांगणीला लावत असतील तर जगायचे कशासाठी, असा प्रश्न रांगेतील महिला कामगारांनी केला आहे. मार्केट यार्डमध्ये दिवसादेखील काही महिला जात नाहीत, त्यांना नावनोंदणीसाठी रात्री वस्ती करावी लागतेय, हीच खंत आहे. या महिलांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्याला सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय जबाबदार असेल, असे बांधकाम कामगारांचे मत आहे.
एजंटांनी भरलेल्या अर्जांच्या नोंदणीसाठी वेगळी रांग केली आहे. तर सर्वसामान्य कामगारांच्या नोंदणीसाठी वेगळी रांग आहे. सर्वसामान्य कामगारांची नोंदणी न करता एजंटांनी दिलेल्या अर्जांचीच नोंदणी सेतू केंद्रावर होत आहे. कामगार मात्र रोजगार सोडून ानोंदणीसाठी रात्रंदिवस रांगेमध्ये उभे रहात आहेत. एक दिवसाचा रोजगार बुडाला तर आठवड्याचे बजेट बिघडते. कोणाचे तरी उसणे पैसे घेऊन घर चालवावे लागते. याकडे सरकार लक्ष देणार का, हा प्रश्न आहे.
बांधकाम कामगारांकडून 4 ते 5 हजार रूपये घेऊन अर्ज भरला जात आहे. कर्ज काढून ठेकेदार आणि एजंटांना पैसे द्यावे लागत आहेत. मग एक रूपयातील नोंदणी योजना गेली कोठे? असा प्रश्न आहे. अधिकाऱ्यांबरोबर भांडण करून अधिकारी एक रूपयात नोंदणी करत होते. परंतु सेतू केंद्रावर मात्र ठेकेदार आणि एजंटाला पैसे दिल्याशिवाय नोंदणीच होत नसल्याने तोंड दाबून बुक्क्यांचा मार बांधकाम कामगारांना सहन करावा लागत आहे. सरकारने याची दखल घेऊन यावर त्वरीत तोडगा काढावा. पुर्वीप्रमाणे पोर्टलवर नोंदणी न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही सर्वच बांधकाम कामगार संघटनांनी दिला आहे.
- बांधकाम कामगारांनी कार्यालयाकडे एजंटांची तक्रार द्यावी
बांधकाम कामगार सेतू केंद्रावर सुरू असलेल्या एजंटांकडे कोणत्याही कामगारांनी जाऊ नये. कोणी एजंट जबदस्तीने पैसे मागत असेल तर त्यांची तक्रार कार्यालयाकडे करावी. करवीर तालुक्यात 25 हजार बांधकाम कामगार असल्याने सेतू केंद्रावर गर्दी होत आहे. त्यामुळे लवकरच एक सुविधा केंद्र वाढवण्याचा प्रयत्न आहे.
विशाल घोडके, सहाय्यक कामगार आयुक्त, कोल्हापूर








