क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने भारताला अच्छे दिन आलेत. अर्थात त्याची प्रचिती आपल्याला विश्वचषकात बघायला मिळत आहे. भारताने सहा वेगवेगळ्या ठिकाणी पाच वेळा धावांचा पाठलाग करत आणि एक वेळा धावसंख्येला डिफेंड करत सहा देशांना जी धूळ चारली ते पाहता भारत या नावाची किती दहशत आहे हे यावरून दिसून येते. कालच्या इंग्लंडच्या सामन्यात सामना सुरू होण्याअगोदर इंग्लंड जर तरच्या गोष्टी करत होती. भारताला पराभूत केल्यानंतर अमुक देशाला तमुक देशाने पराभूत केल्यावर आपण सुपर फोरपर्यंत पोचू शकतो, असा कयास त्यांनी लावला होता. परंतु घडलं काय ते आपण बघितलंच. इंग्लंडचं पुरतं वस्त्रहरण झालं. उरली सुरली इज्जत होती तीही गेली. आणि हताश होण्याशिवाय कुठलाच पर्याय जोस बटलरसमोर राहिला नाही.
लखनौच्या खेळपट्टीने दोन्ही संघावर अन्याय केला नाही. पाच सामने जिंकून सुद्धा उपांत्य फेरीचे द्वार भारताला पूर्णत: उघडलं नव्हतं. परंतु कालच्या विजयाने ते सताड उघडलं. काल दव फॅक्टर येण्याअगोदरच शमी आणि बुमराहने खऱ्या अर्थाने गोऱ्यांचे खच्चीकरण केले. चेंडू रात्रीचा ओला होण्याअगोदरच इंग्लंडला डिल करून टाकलं. इंग्लंडच्या स्कोअरकार्डकडे बघितलं तर टपरीच्या नाश्ता सेंटरवर नाश्त्याचे जे दरपत्रक असतं तसेच काहीसे दरपत्रक इंग्लंडच्या धावफलकावर बघायला मिळाले. इंग्लंडचा बटलर सलामीला का नाही आला ते न उलगडणारं कोडं होतं.
आज मी विशेषत: भारतीय गोलंदाजीचे कौतुक करेन. बुमराहकडे बघा, एक ते सव्वा वर्षापासून तो क्रिकेटपासून दूर होता. परंतु त्याने ती कसर विश्वचषकात भरून काढली. त्याचे यॉर्कर तर फलंदाजांना भुईसपाट करतातच, परंतु गुडलेंग्थ स्पॉटवरून जे चेंडू कधी बाहेर तर कधी आत आणतो, तेच खऱ्या अर्थाने त्याचे ब्रह्मास्त्र आहे. दुसऱ्या बाजूला मोहम्मद शमी, संघाच्या एका मागोमाग एक विजयानंतर शमीला संधी मिळणार की नाही किंबहुना 1983 सालच्या विश्वचषकातील भारतीय संघातील सुनील वॉलसनसारखी बेंच बॉयची भूमिका बजावणार काय, असं वाटत असतानाच त्याला संधी मिळाली आणि लगेच संधीचं सोनं केलं. हॉकीमध्ये गोलकीपरने कितीही गोल अडवले तरी तो मागासलेलाच राहतो. परंतु एक किंवा दोन गोल करणाऱ्याला अक्षरश: खांद्यावर नाचवलं जातं. सुरुवातीला शमीवर तेवढा विश्वास नव्हता. परंतु एखाद्यावर कप्तान ज्यावेळी विश्वास दाखवतो त्यावेळी काय अद्भुत चमत्कार घडू शकतो, ते शमीने एकदा नव्हे दोनदा करून दाखवलं. 2020 मध्ये शमी पांढऱ्या क्रिकेटमधून बाहेर होता. परंतु 20 महिन्यानंतर शमी परतला तो पूर्णत: फिट होऊनच. गोलंदाज आणि यशस्वी पुनरागमन ही गोष्ट तेवढी सोपी नाही, परंतु हे काम शमीने अगदी सोपं करून दाखवलं.
विश्वचषकात भारतीय गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. कांगारूंना 200 च्या आत गुंडाळलं. पाकिस्तानला दोन बाद 155 वरून दोनशे सव्वा दोनशेत रोखलं. आणि काल-परवा तर इंग्लंडचा 129 मध्ये खुर्दा. एकंदरीत भारतीय गोलंदाजांना काळा टीका लावावा, अशीच एकंदरीत कामगिरी. असो एकंदरीत इंग्लंडचं पॅकअप झालंय. अर्थात त्याला कारणीभूत कोण? हे त्यांच्या टीम मॅनेजमेंटसाठी संशोधनाचा विषय असणार यात काही शंका नाही. पाच पराभूत झालेल्या सामन्यात खरे गुन्हेगार कोण, याचा शोध इंग्लंडला घ्यावाच लागेल यात शंका नाही.
विजय बागायतकर, क्रिकेट समालोचक









