शिमग्याचे दिवस म्हणजे ऐन उत्साहाचे दिवस. दिवसभर काजू बोंडे गोळा करीत संध्याकाळी शिमग्याच्या मांडावर रमण्याचे दिवस. गावागावांत वर्षपध्दतीप्रमाणेच होळी साजरी झाली मात्र यंदा कुणालाही चाहुल लागू न देता निसर्गही होळी खेळला. जंगलांची राख रांगोळी रोखण्यासाठी यंदा तरुणांना शिमग्याच्या माहोलात जंगलांकडे धाव घ्यावी लागली. उष्म्याने नागरिकच नव्हे निसर्गही हैराण झाला आहे. गोव्याने अशी नैसर्गिक आपत्ती प्रथमच अनुभवली. मानवनिर्मित आणि निसर्गनिर्मित अशा दोन्ही प्रकारच्या घटनांनी सध्या गोवा चिंतेत सापडला आहे. अघटित घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यांना रोखायला आपत्ती व्यवस्थापन सक्षम असायलाच हवे. गोव्यात अनेक स्वरुपातील वणवे धुमसत आहेत. हे वणवे शमविण्याचा कठीण काळ आलेला आहे. कोण शमविणार हे वणवे?
गोव्यात घडणाऱ्या बऱ्याच वाईट गोष्टी इथल्या शांत जनतेला चिंता व्यक्त करायला भाग पाडतात. सर्वसामान्य गोमंतकीय चिंता व्यक्त करण्यापलिकडे वेगळे काही करू शकत नाही. मागचे दोन-तीन आठवडे गोव्यात रस्ता अपघातांनी थरकाप उडविला होता. रस्त्यावरील अपघाती मृत्यू अद्याप काही थांबलेले नाहीत. खून, बलात्कार, खंडणी, चोऱ्या-माऱ्या, अपहरण, आर्थिक फसवणूक आणि अल्पवयीन मुलांवरील अत्याचार, जमिनींचे घोटाळे अशी गोव्यात माजलेली गुन्हेगारी आटोक्यात काही येत नाही. त्यात भरीस भर म्हणून नैसर्गिक आपत्तींनीही हल्लीच्या काही वर्षांत गोव्यात बेधडक प्रवेश केलेला आहे. आता गोव्यातील डोंगरांवर पसरू लागलेले वणवे, हे नवीन संकट आहे. आत्ताच कुठे आटोक्यात येत असलेली ही आग आपत्ती व्यवस्थापनाबाबत मात्र प्रश्न उपस्थित करत आहे.
गोमंतकीय जनता शांत असली तरी गोवा आता पूर्वीसारखा शांत राहिलेला नाही, असे शब्द अनेकवेळा कानावर पडतात. गोवा आता धगधगता प्रदेश बनू पाहात आहे. सद्यस्थितीवर बोट ठेवूनच अशा भावना व्यक्त होतात. गोव्यातील डोंगर कधी पेट घेतील, असे कधी कुणाला स्वप्नातही वाटले नसेल. जगात काही ठिकाणच्या जंगलात वणवा पसरल्याच्या बातम्या वाचनात येत असत. भारतातही अशा घटना कधीतरी घडत. जंगलांत वणवा पसरण्याच्या घटनांपासून गोवा पंधरा दिवसांपूर्वीपर्यंत तरी मुक्तच होता पण आता आम्ही त्याबाबतीतही जगाच्या नकाशावर आलो आहोत. गोव्याचे हवामान बदलत आहे. तापमान विक्रम स्थापित करीत आहे. असह्या उष्णतेने रानेवनेही पेटू लागलेली आहेत. गोव्याला निसर्गाचे वरदान लाभलेले आहे. त्यामुळे भरपूर पाऊस हे गोव्याचे वैशिष्ट्या. तरीही पूर्वी गोव्यात पूर अपवादानेच येत असत. पूर्वीसारखा पाऊस आता कोसळत नाही मात्र मागच्या पंचवीस वर्षांत गोव्यात कुठल्या ना कुठल्या भागात पूर आल्याचे किंवा पूरसदृष्य स्थिती निर्माण झालेली आहे. दरवर्षी येणाऱ्या पुराचे कारण निसर्ग आहे की मानवी चुका, हे सांगायला नको. काणकोणमध्ये ढगफुटीमुळे आलेला महापूर कोणी विसरणार नाही. हा पूर अनेकांचे जीवनच उद्ध्वस्त करून गेला. निसर्गाचा समतोल बिघडला तर काय घडू शकते याचे ते ज्वलंत उदाहरण होते. तरीही आपला गोवा काही भानावर येत नाही. पुराच्या घटनांबरोबरच वादळ किंवा तुफान अशा नैसर्गिक प्रकोपासून गोवा दूरच होता मात्र आता गोव्याला वादळांचाही सामना करावा लागत आहे. एकेकाळी ऊन, वारा, पाऊस सक्षमपणे झेलत उभा राहणारा गोवा आता अल्पशा पावसात बुडतो. वादळ वाऱ्यात आडवा होतो. भविष्यात गोव्याला भूकंप, ज्वालामुखी अशा संकटांनाही तोंड द्यावे लागणार नाही ना, याची चिंता नक्कीच राहील.
आपापल्या काजू बागायतीत पालापाचोळा गोळा करून जाळणे हा येथील कष्टकऱ्यांचा नित्यक्रम. त्याचे कधी वणव्यात रुपांतर झाले नाही किंवा होऊ दिले नाही. यंदा मात्र चित्रच पालटले आहे. निसर्ग असाच आग ओकू लागला तर त्याला सामोरे जावेच लागेल. आग गोव्यातल्या एखाद्याच डोंगरावर लागलेली नाही. दिवसामागोमाग गोव्यातील अनेक डोंगरांवर वणवा पेटू लागला. वाळपई, सत्तरीपासून काणकोणपर्यंत शंभरहून अधिक गावांमध्ये निसर्ग पेटला. वनराईची राख झाली. सुक्याबरोबर ओलेही जळणारच होते. जंगलातील जीवांचे काय झाले असतील, याची कल्पना करवत नाही. गावातील डोंगरच नव्हे तर शहरांजवळच्या ग्रामीण भागातील जंगलांनीही पेट घेतला. आजही जंगलांमध्ये आग धुमसत असल्याचे ऐकिवात आहे. या घटनांमागे मानवी चुका की घातपात, असा संशय व्यक्त केला जाऊ शकतो. परंतु सत्तरीतील संशय थेट काणकोणपर्यंत पसरवू नये. पेटलेल्या या वणव्यांबाबत थेट निष्कर्ष काढणे चुकीचेच आहे.
गोव्यातील नैसर्गिक हवामान बदलत आहे. वारंवार घडणाऱ्या घटनांची दखल सरकारलाही घ्यावी लागली आहे. गोव्यात अकरा ठिकाणी चक्रीवादळाचा अंदाज वर्तविणारे मनोरे उभारले जात आहेत. आपत्तीग्रस्तांसाठी अकरा ठिकाणी निवारा केंद्रे उभारली जात आहेत. हल्लीच मुरगावच्या सांकवाळ आणि कुयेली भागात मुख्यमंत्र्यांनी अशा दोन केंद्रांचे लोकार्पण केले. आपत्ती हाताळण्यासाठी या सुविधांचा उपयोग होईल. तरीही आपला गोवा आपत्ती हाताळण्यासाठी सक्षम बनलेला नाही. गोव्यातले राजकीय हवामान तसे बदलतच असते. इथले राजकारण कधी कधी नको त्या पातळीपर्यंत पेट घेते. व्यर्थ राजकारणापेक्षा आपत्ती व्यवस्थापनातील उणिवांवर कुणी बोलले असते तर प्रशासनावर दबाव आला असता. जबाबदार नेते म्हणून वणव्यासारख्या प्रसंगांना कसे सामोरे जाता येईल, यासंबंधी सूचनाही मांडता आल्या
असत्या.
गोव्यातील जंगलांना लागलेल्या आगीतून वनराई कशीतरी सावरली असली तरी भविष्यात अशा प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी सज्जता ठेवणेच इष्ट ठरेल. आपत्ती व्यवस्थापनातील उणिवा या आधीही उघड्यावर पडल्या होत्या. ताज्या प्रसंगांनीही उणिवा अधोरेखित केलेल्या आहेत. काही राजकारण्यांना वणव्यात पोळी भाजून घ्यावी, असे वाटले असेल तर नवल नाही. आपल्यासाठी राजकीय वणवे नित्याचेच झालेले आहेत. महागाईच्या वणव्यात सामान्यजन होरपळत आहे. गुन्हेगारीचा वणवा गोव्यात सुरक्षेचा प्रश्न निर्माण करतोय. वाढत्या रस्ता अपघातांमुळे अनेकांच्या देहांची नाहक राख होते. संसार उद्ध्वस्त होतात. अशा घटना मन व्यथीत करतात. नको त्या दिशेने जाणारे गोव्यातील पर्यटनही सुप्त वणवा बनलेला आहे. त्याचा कधीही विस्फोट होऊ शकतो.
अनिलकुमार शिंदे








